एरंडोलला सराफाच्या दुकानात चोरी.अडीच लाखाचा ऐवज लंपास, व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण.चोरटे सीसीटीव्हीत कैद.

Spread the love

एरंडोल-येथील मेनरोडवर असलेल्या माउली ज्वेलर्स या सराफाच्या दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.शहराच्या प्रमुख रस्त्यावर असलेल्या गजबजलेल्या परिसरातील सराफ व्यावसायिकाच्या दुकानात चोरी झाल्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.याबाबत माहिती अशी,की नागोबामढी परिसरातील रहिवासी असलेल्या प्रसाद अजय वाघ यांचे मेनरोडवर माउली ज्वेलर्स नावाने सोने चांदी दागिने विक्रीचे दुकान आहे.

प्रसाद वाघ यांनी ६ मार्च रोजी सायंकाळी दुकान बंद केल्यानंतर ७ मार्च रोजी सकाळी नासिक येथे ते विवाह सोहळ्यासाठी बाहेरगावी गेले होते.१० मारच रोजी नासिक येथून विवाह सोहळा कार्यक्रम आटोपल्यावर ते घरी आले आणि रात्री अकरा वाजेच्या सुमारास दुकानाकडे गेले होते.त्यावेळी दुकानाचा दरवाजा लावलेला असल्यामुळे ते घरी गेले.आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास दुकाना शेजारी असलेल्या भगवान गोविंदा चौधरी यांनी प्रसाद वाघ यांना फोन करून तुमच्या दुकानाचे शटर वाकलेले असल्याचे सांगितले.

प्रसाद वाघ हे त्यांचे भाऊ सिद्धेश वाघ यांचेसह दुकानाकडे आले असता त्यांना दुकानाचे शटर वाकलेले व आतील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले.त्यांनी चोरीबाबत पोलिसाना कळवल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे यांचेसह हवालदार सुनील लोहार,अनिल पाटील,चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.मेनरोडवर लावण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही.फुटेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडून ईको वाहन येत असल्याचे दिसत आहे.मारुती ईको गाडीमधील चार अज्ञात व्यक्ती तोंडाला रुमाल लाऊन दुकानाचे शटर उघडत असल्याचे दिसून आले.

अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्यानंतर दुकानात असलेल्या invhartarच्या वायरी तोडल्याचे आढळून आले.चोरीत ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने,४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे पॉलीश केलेले दागिने,१लाख १० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या पॉलीश केलेल्या फुल्या ५० हजार रुपये किमतीचे चांदीच्या वस्तू असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.याबाबत प्रसाद अजय वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.दरम्यान मेनरोडवर असलेल्या व कायम वर्दळ असलेल्या ठिकाणी चोरी झाल्यामुळे चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार