WPL:कर्णधार हरमनप्रीत कौरच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा आठ गडी राखून केला पराभव

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महिला प्रीमियर लीगच्या १०व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सवर दणदणीत विजय मिळवला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर त्यांनी यूपी संघाचा आठ गडी राखून पराभव केला. मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय आहे. यूपी वॉरियर्सची कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यूपीने २० षटकांत ६ बाद १५९ धावा केल्या. मुंबईने १७.३ षटकात २ बाद १६४ धावा करत सामना जिंकला.महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सची विजयी मालिका सुरूच आहे. त्यांनी सलग चौथा सामना जिंकला आहे.

मुंबईने यूपी वॉरियर्सवर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह मुंबईने स्पर्धेत सहभागी इतर चारही संघांचा पराभव केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला संघ ठरला आहे. मुंबईसाठी कर्णधार हरमनप्रीत कौरने धडाकेबाज खेळी केली. तिने ३३ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या. यादरम्यान हरमनप्रीतने नऊ चौकार लगावले. तिच्या बॅटमधून एक षटकारही निघाला. नताली सीव्हर ब्रंट ३१ चेंडूत ४५ धावा करून नाबाद राहिली. हरमनप्रीत आणि नताली सिव्हर यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद १०६ धावांची भागीदारी केली. त्याचवेळी यास्तिका भाटियाने २७ चेंडूत ४२ धावा केल्या. हिली मॅथ्यूज १७ चेंडूत १२ धावाच करू शकली.

यूपीकडून राजेश्वरी गायकवाड आणि सोफी एक्लेस्टोनने प्रत्येकी एक विकेट घेतली. यूपीकडून कर्णधार अॅलिसा हिलीने सर्वाधिक ५८ धावा केल्या. ताहलिया मॅकग्राने ५० धावांची खेळी केली. किरण नवगिरेने १७ धावांचे योगदान दिले. सिमरन शेखने नऊ, दिप्ती शर्माने सात आणि देविका वैद्यने सहा धावा केल्या. सोफी एक्लेस्टोनला केवळ एक धाव करता आली. श्वेता सेहरावत दोन धावा केल्यानंतर नाबाद राहिली. मुंबईकडून सायका इशाकने तीन बळी घेतले. अमेलिया केरला दोन तर हिली मॅथ्यूजने एक विकेट घेतली.

मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने धडाकेबाज खेळी करताना ३३ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या. त्यासाठी तिला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. उद्या दिल्ली विरुद्ध आरसीबी सामना डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम येथे संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे. आरसीबी अजूनही त्यांचा पहिला विजय शोधत आहे. तर दिल्ली तक्त्यामध्ये दुसरे स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार