धक्कादायक : लग्नाचं आमिष देत वारंवार अत्याचार, तरुणी गर्भवती राहताच कॉफी अन् पपई खाऊ घालत गर्भपात

Spread the love

जळगाव : – लग्नाचे आमिष देत तरुणीवर वारंवार अत्याचर केले. जेव्हा ती गर्भवती राहिली तेव्हा तिचा गर्भपात घडवून आणला. जेव्हा हे सारं तिच्या घरच्यांना कळालं तेव्हा तरुणाच्या घरच्यांनी लग्नासाठी होकार दिला. पण, ऐन लग्नाच्या वेळी त्यांनी लग्नास नकार दिला. जळगावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून एका तरुणाने १८ वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर दोन वर्षांपासून अत्याचार करून तिला गर्भवती केलं. त्यानंतर पपई, तसेच कॉफी पाजून तिचा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात तरुणासह त्याचे आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागात १८ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तरुणीची सोशल मीडियाच्या माध्यमातून एरंडोल शहरातील इस्लामपूरा भागात राहणारा हसन असलम मोमीन या तरुणाशी ओळख झाली. त्यावेळी ती अल्पवयीन होती. त्यांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाल्यानंतर हसन याने तिला लग्नाचे आमिष दाखविलं. याबाबत तो तरुणीच्या सांगण्यानुसार तिच्या कुटुंबियांना सुध्दा भेटला.

मात्र, त्याचे स्वत:चे आई-वडील लग्नाला तयार नसल्याचे सांगत त्याने दोन वर्षानंतर मी त्यांची समजूत काढून लग्न करेन असे मुलीला तसेच तिच्या वडिलांना सांगितले. याचप्रकारे लग्न करण्याचे आमिष देत हसनने मुलीसोबत तिच्या इच्छेविरुध्द वेळोवेळी अत्याचारही केले. यादरम्यान, मुलीच्या कुटुंबियांना ही बाब माहिती पडल्यानंतर त्यांनी हसन याला लग्नाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने आई-वडील तयार नसल्याचं सांगत टाळाटाळ केली होती. यावेळी त्याच्याविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल सुध्दा झाला होता आणि त्याला अटकही करण्यात आली होती.

तरुणासह आईने तरुणीला पपई अन् कॉफी पाजून केला गर्भपात

हसन याला अटक झाल्यानंतर त्याच्या आई- वडिलांनी मुलीच्या कुटुंबियांना गुन्हा मागे घ्यायला सांगितलं. तसेच, त्याला जेलमधून बाहेर येवू द्या मग दोघांचे लग्न लावून देवू, असे आश्वासन दिले. मात्र, यानंतरही पुढे त्यांनी वेळ मारुन नेली. २०२२ मध्ये पुन्हा हसन हा बाहेर आल्यानंतर मुलीला लग्नाचे आमिष दाखवित, तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. याच अत्याचारातून तरुणी गर्भवती राहिली. हे हसन याने त्याच्या आईला सांगितलं. त्यानुसार हसन आणि त्याच्या आईने तरुणीला पपई तसेच कॉफी देऊन तिचा गर्भपात केला. या घटनेने तरुणीला चांगलाच धक्का बसला. तिने ही बाब तिच्या आई-वडिलांना सांगितली.

‌लग्नपत्रिका छापायचे सांगितले, लग्नाच्या दिवशी तरुण आलाच नाही

गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार कळाल्यावर वडिलांनी हसन याच्या आई-वडिलांना फोनकरुन बोलावून घेतले. हसन आणि तरुणीच्या लग्नाची तारीख निश्चित केली. यावेळी घरासमोर लग्न लावून देवू, तुम्ही लग्नपत्रिका छापून घ्या, असेही हसनच्या आई-वडिलांनी तरुणीच्या आई-वडिलांना सांगितले. त्यानुसार, तरुणीच्या वडिलांनी लग्नपत्रिका छापल्या, लग्नाची तयारी केली. ठरल्या तारखेला अंगणात लग्नासाठी मंडप सुध्दा टाकला.

मात्र, हसन आला नाही. त्याच्या कुटुंबातील कोणीच आले नाही. यावेळी हसनने थेट तरुणीच्या वडिलांना मला लग्न करायचे नाही असं फोन करुन सांगितलं. ते ऐकून तरुणीच्या वडिलांना मोठा धक्का बसला. आपली आणि आपल्या मुलीची हसन आणि त्याच्या कुटुंबियांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर तरुणीला सोबत घेत तिच्या वडिलांना रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन रविवारी रात्री ११ वाजता संशयित हसन असलम मोमीन, त्याची आई मुन्नी आणि असलम मोमीन या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ देशमुख करीत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार