जवान सुट्टीवर घरी आला, जिन्यात चक्कर, तोल जाऊन पडला अन् क्षणात होत्याचं नव्हतं…

Spread the love

जळगाव: – सैन्यातून सुट्टीवर घरी आलेल्या एका जवानाचा अचानक मृत्यू झाला आहे. या जवानाच्या मृत्यूने संपूर्ण जळगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. जवानाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून दोन पोरांचं पितृछत्र हरपलं आहे.

जळगाव शहरातील कांचननगर येथे सुट्टीवर घरी आलेल्या जवानाला मृत्यूने गाठले आहे. जिन्यातून जात असताना चक्कर येऊन पडल्याने या जवानाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विशाल भरत सैंदाणे (वय-३५ रा. कांचन नगर, चौगुले प्लॉट, जळगाव) असे मृत जवानाचे नाव आहे. ते सैन्य दलात न्हावी म्हणून कार्यरत होते. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जिन्यावरुन खाली उतरत असताना चक्कर आली

कांचनगरातील चौघुले प्लॉट येथील रहिवासी विशाल सैंदाणे हे भारतीय सैन्य दलात नोकरीला होते. ते सध्या उत्तरप्रदेश राज्यात कर्तव्य बजावत होते. सैन्य दलात न्हावी म्हणून ते सेवा बजावत होता. गेल्या काही दिवसांपूर्वीच तो सुट्टीवर घरी कांचननगर येथे आला होता. बुधवारी रात्री ९ वाजता घराच्या पहिला मजल्याच्या जिन्यावरून खाली उतरत असताना विशाल यांना चक्कर आली. चक्कर आल्याने ते तोल जाऊन जिन्यावरून खाली कोसळले. यात ते गंभीर जखमी झाले होते. शेजारी राहणाऱ्या तरूणांच्या मदतीने त्यांना सुरुवातीला खाजगी रुग्णालात हलविण्यात आले आणि त्यानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झालेला होता.

एकुलत्या एक मुलाच्या मुत्यूने कुटुंबावर दु:खांचा डोंगर

अनेक दिवसानंतर विशाल हे सुट्टीवर आल्याने त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, अचानक त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला. विशाल हे घरातील एकुलते होते, असे असतानाही देशसेवेसाठी कुटुंबियांनी विशाल यांना सैन्य दलात पाठविले होते. एकुलत्या एक मुलाच्या अशा अपघाती मृत्यूने विशाल याच्या आई-वडिलांवर आणि पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुरूवारी दुपारी जवान विशाल यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.

चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले

विशाल यांच्या मृत्यूने त्यांच्या दोन चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहे. मृत जवान विशाल यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि लहान मुलगा आणि मुलगी, बहीण असा परिवार आहे. देशसेवा करणाऱ्या जवानाच्या अशा अपघाती तसेच दुर्देवी मृत्यूने जळगाव शहर सुन्न झाले आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार