मुंबईचा सलग दुसरा मोठा पराभव
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महिला प्रीमियर लीगच्या १८ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा नऊ गडी राखून पराभव केला. डीवाय पाटील स्टेडियमवर ९ षटकांत ११० धावांचे लक्ष्य गाठले. दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लैनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सचा संघ २० षटकांत आठ गडी गमावून १०९ धावाच करू शकला. दिल्लीने नऊ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ११० धावा करून सामना जिंकला. या विजयासह दिल्लीचा संघ गुणतक्त्यात अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्यांनी मुंबई इंडियन्सला पहिल्या स्थानावरून हटवले.
दिल्लीचा सात सामन्यांमधला हा पाचवा विजय आहे. त्यांचे १० गुण झाले. मुंबईचेही सात सामन्यांतून १० गुण आहेत, पण त्यांची निव्वळ धावगती दिल्लीपेक्षा कमी आहे. दिल्लीची निव्वळ धावगती +१.९७८ आहे आणि मुंबईची +१.७२५ आहे. मंगळवारी (२१ मार्च) मुंबईला शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध खेळायचा आहे. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सला यूपी वॉरियर्स विरुद्ध खेळायचे आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सच्या संघांनी आपले सामने जिंकल्यास १२ गुण होतील. पराभूत झाल्यावर दोघांचे १० गुण होतील. अशा स्थितीत अंतिम फेरीत जाणारा संघ निव्वळ धावगतीच्या आधारे ठरवला जाईल. दुसरीकडे, जर एक संघ हरला आणि दुसरा जिंकला, तर विजेता संघ अंतिम फेरीत पोहोचेल.

दिल्लीकडून कर्णधार मेग लैनिंग, एलिस कैप्सी आणि शफाली वर्मा यांनी तुफानी खेळी खेळली. तिघींनीही झटपट धावा केल्या. एलिस कैप्सीने सर्वाधिक नाबाद ३८ धावा केल्या. १७ चेंडूंच्या खेळीत तिने फक्त एक चौकार मारला. एलिस कैप्सीच्या बॅटमधून पाच लांब षटकार निघाले. कर्णधार मेग लैनिंगने २२ चेंडूत ३२ धावा केल्यानंतर नाबाद राहिली. तिने चार चौकार मारले. शफाली वर्माने १५ चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने ३३ धावा केल्या. लॅनिंग आणि शफाली यांनीही प्रत्येकी एक षटकार ठोकला. हिली मॅथ्यूजने मुंबईला एकमेव यश मिळवून दिले.

मुंबईकडून पूजा वस्त्राकरने सर्वाधिक २६ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर २३, इस्सी वाँग २३ आणि अमनजोत कौर १९ धावा करून बाद झाल्या. अमेलिया केरने आठ, हिली मॅथ्यूजने पाच आणि यास्तिका भाटियाला एकच धाव करता आली. नताली सीवर ब्रंटला खातेही उघडता आले नाही. दिल्लीसाठी मरिजान कैपने भेदक गोलंदाजी केली. तिने चार षटकांत १३ धावा देत दोन बळी घेतले. शिखा पांडे आणि जेस जोनासेन यांनाही प्रत्येकी दोन यश मिळाले. अरुंधती रेड्डीने एक विकेट घेतली.
मरिजान कैपला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






