भुसावळच्या चाँद सरवर तडवी ऊर्फ बेबोची ही गाथा. जी पोलिस भरतीसाठी ‘तृतीयपंथीय’ उमेदवार आहे.
जळगाव : वंशाचा दिवाही नाही आणि प्रकाश पेरणारी पणती जन्मली म्हणून कुणी म्हटलं नाही. तृतीयपंथी म्हणूनच आली ‘चाँद’ जन्माला… नियतीही नित्यनियमाने संकटे पेरत होती. संकटांनीच लढायला शिकवलं… म्हणून तर वेदनांच्या गढीवर उभारलेल्या गुढीवर ‘चाँद’ सरसावला आहे विजयी पताका फडकवायला… भुसावळच्या चाँद सरवर तडवी ऊर्फ बेबोची ही गाथा. जी पोलिस भरतीसाठी ‘तृतीयपंथीय’ उमेदवार आहे.
जन्म १९९४ मधला. आजी, आई-वडील, तीन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार. वयाच्या दहाव्याच वर्षी चाँदला फसव्या प्रेमाने हेरलं आणि ‘किन्नर’ आहे कळताच क्षणात दूर सारलं. तेव्हा ‘चाँद’ला धक्का बसला. ती भुसावळच्या किन्नरी मठात जात गेली आणि ‘किन्नर’पण अभ्यासत गेली. चाँदने धुळ्यातील यल्लम्मा मातेचा जोगवा स्वीकारला.
चाँदच्या आजीचा २०१५ मध्ये कर्करोगाने मृत्यू झाला. पाठोपाठ २०२१ मध्येही आईला कर्करोगाने हेरले. तेव्हा ‘चाँद’चे आयुष्य संकटांच्या ढगात दडले. आईने कुशीत घेतलं आणि तिन्ही बहिणींसह भावाची तूच आता माता हो म्हणून सांगत जगाचा निरोप घेतला. तेव्हा चाँद रेल्वेत पैसे मागत गेली आणि घरसंसार सुरू ठेवत गेली. धुळ्यातील गुरुवर्य पार्वती परसराम जोगी यांचा चेला बनलेल्या चाँदला नीलू गुरू, शमीभा पाटील, समाधान तायडे यांनी सुखकर वाटेवर नेले. म्हणून ती फर्दापूर (औरंगाबाद) महाविद्यालयातून शैक्षणिक प्रवाहात राहिली.
…म्हणे क्लासमध्ये प्रदूषण होईल..!
सरावासाठी मैदान गाठले तेव्हा तिथेही हीनवणारे होतेच. काहींनी वेश्याव्यवसायासाठी तिचा हात धरला; पण मैत्रीण आम्रपालीने तिला सुखरूप परत आणले. इरफान शेख यांनी चाँदचा हात धरला व तिला मैदानावर उतरविले. काहींनी अभ्यासक्रमाच्या दाराशी नेले व तयारी करून घेतली.
राज्यातून ‘चाँद’ पहिली
भरतीत सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये ‘थर्ड जेंडर’ म्हणून ती पात्र ठरली. १७ मार्चला मैदानही जिंकले. आयुष्यभर सत्त्वपरीक्षा देणारी चाँद २ एप्रिलला लेखी पेपर देणार आहे. भरतीसाठी ‘तृतीयपंथीय’ उमेदवार म्हणून ती पहिलीच आणि राज्यातून एकमेव.
धुळ्यातील पोलिस भरती सर्वांत आधी सुरू झाली. त्यामुळे भरतीत सहभागी होणारी ती पहिलीच होती. शासन निर्णयानुसार तिला संधी दिली आहे. तिची जिद्द पाहून सर्वांनाच आनंद वाटला. – संजय बारकुंड, पोलिस अधीक्षक, धुळे.
हे वाचलंत का ?
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………