धाराशिव : एका हॅकरने फिर्यादीची पत्नी व बहिणीचा अश्लिल व्हिडीओ बनवून तो वेबसाईटवर टाकण्याची धमकी दिली. तसेच बायकोची आणि बहिणीची काळजी असेल तर मला एक लाख रूपये तत्काळ दे…
असे सांगत आणखी एक अश्लील व्हिडिओ क्लिप पाठवून, दम असेल तर मला पकडून दाखव, म्हणत आव्हान फिर्यादीलाच चिथावणी दिली. याप्रकरणी फिर्यादीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून संबंधिताविरूद्ध मुरूम पोलिस ठाण्यात भा.दं.सं. कलम २९५ (A) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (C) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील (नाव गाव गोपनीय, वय २८ वर्षे) फिर्यादीला दिनांक १९ मार्च रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने हाय असा मेसेज टाकून, एक स्टोरी पाठवली. ती स्टोरी त्यांनी पाहिली असता,
त्यामध्ये त्यांच्याच फेक आयडीवरून आणि त्यांच्याच पत्नीच्या फोटोवर अश्लील फोटो, व्हिडिओ स्टिकर लावून त्यांना ती स्टोरी पाठवली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी त्याच मोबाईल क्रमांकावर तत्काळ व्हिडिओ कॉल केला. मात्र, तो रिसिव्ह झाला नाही. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीच्या फोटोवर अश्लील मजकूर लिहून फोटो पाठवण्यात आला. या घटनेनंतर संबंधिताला मेसेज टाकून त्याच्याशी चॅटिंग करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने शिविगाळी केली. आता बघत रहा काय काय होईल, असे म्हणत तुझ्या आणि तुझ्या बहिणीचा रक्षाबंधनाचा फोटो सुद्धा मी एका अश्लील वेबसाईटवर टाकत आहे. तुझी बहिण आता फेमस होईल, तिला ७५ मिनीटामध्ये १.१ मिलियन लोकांनी बघितले आहे.

दुपारपर्यंत तुझ्या बायकोचा आणि बहिणीचा अजून एक व्हिडिओ बनवतो आणि अजून एका वेबसाईटवर टाकतो, अशी धमकी देण्यात आली.याशिवाय मी तुला माझा ओरिजनल फोटो पाठवतो, दम असेल तर मला पकडून दाखव… पोलिसांकडे जा किंवा कुठे जायचे तिथे जा, मी आधीच चार वर्षे जेलमध्ये राहून आलोय. मी एक इंजिनीयर आहे. प्रोफेशनल हॅकर आहे. पोलिसच काय तुझा बाप पण मला पकडू शकत नाय. तुझ्या बहिणीच्या एका व्हिडिओला मला ७० हजार रूपये मिळाले. आता तुला तुझ्या बायकोची आणि बहिणीची काळजी असेल, तर मला एक लाख रूपये तातडीने दे… असे म्हणून त्याने एक अश्लिल व्हिडिओ क्लिप पाठवली.

दरम्यान, या फेक अकाऊंटवर त्याने राजमाता जिजाऊ व फिर्यादीच्या पत्नीचा फोटो लावून, अश्लिल मेसेज टाईप केलेला व्हिडीओ व त्यावर अश्लिल स्टीकर्स लावून फोटो स्टोरी व्हायरल केली. २२ मार्च रोजी सकाळी इंस्टाग्राम अकाऊंट आयडीवर फिर्यादीच्या चुलत भावाच्या मुलीचा व तिच्या पतीचा आणि तिची सासू व नणंद यांचा फोटो इंन्स्टाग्राम स्टोरीला अश्लिल स्टीकर लावून लावला. तसेच त्याच्या पुढच्या स्टोरीला छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांच्या कोथळा बाहेर काढलेल्या फोटोवर दोन अर्धनग्न महिलांचे स्टीकर लावलेला फोटो व त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अश्लिल मजकूर व शिवीगाळ लिहिलेली फोटो स्टोरी ठेवली होती.
अज्ञात हॅकरने फिर्यादीच्या बनावट आयडीवर त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तींचे १९ मार्च ते २२ मार्च या कालावधीत वेळोवेळी अश्लिल फोटो व स्टिकर व्हिडीओ तयार करून पाठवले. एवढ्यावरच न थांबता त्याने छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या फोटोवर अश्लिल मजकूर लिहून इंस्टाग्राम अकाउंटवर पाठवला.
या पोस्टमुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या असून, संबंधित व्यक्तीविरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी तक्रार फिर्यादीने मुरूम पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून संबंधिताविरूद्ध मुरूम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.






