शिर्डी येथे आयोजित महापशुधन एक्स्पो मध्ये जळगाव जिल्ह्यातील सातपुडा देशी नं १

Spread the love

जळगाव : साईबाबांच्या शिर्डीत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तीन दिवसीय महा पशुधन एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून राज्यासह देशभरातून वेगवेगळ्या जातीचे पशुधन या प्रदर्शनात सहभागी झाले होते.

तसेच जळगाव जिल्ह्यातील सातपुडा देशी ‘पक पक पकाक पक’ करीत पशुतज्ज्ञांचे स्वागत करणाऱ्या ‘सातपुडा देशी’ वाणाच्या कोंबडीने साईनगरीतले ‘महापशुधन एक्स्पो’ जिंकले आहे. ‘सातपुडा देशी’ या जातीची कोंबडीने साईनगरीतही सात्त्विक तोरा कायम ठेवला आणि कुक्कुट गटात अव्वल येण्याचा मान मिळविला.

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शिर्डी येथे २४ ते २६‎ मार्च या कालावधीत ‘महापशुधन एक्स्पो २०२३’ चे‎ आयोजन करण्यात आले होते. या पशु प्रदर्शनात राज्यातील व राज्याबाहेरील अंदाजे जातीवंत‎ गाय-म्हैस वर्गीय ,कुक्कुट वर्गीय पक्षी, अश्व‎ जातीची १२७० जनावरे सहभागी झाले होते. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने कुक्कुट गटात ‘सातपुडा देशी’ कोंबडीला सहभागी केले होते. या प्रदर्शनात तज्ज्ञांद्वारे परिक्षण करण्यात आले. वाढीचा वेग चांगला, अधिक अंडी उत्पादन क्षमता, चांगली रोग प्रतिकार क्षमता असलेल्या ‘सातपुडा देशी’ जातीची कोंबडी कुक्कुटपालन व्यवसायासाठी सर्वाधिक लाभदायी असल्याचे स्पष्ट झाले. तसेच परसातील कुक्कुटपालनासाठी ही योग्य जात असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदविले.

त्यानंतर जाहीर झालेल्या निकालात अव्वल ठरलेली खान्देशी कोंबडी ‘पक पक पकाक पक’…करीत गावाकडे परतली आहे.प्रसार, प्रचारासाठी प्रयत्न सातपुडा कोंबडी पालनासाठी स्थानिक लोकांची मागणी जास्त आहे, त्यामुळे अंडी उबवण केंद्रांची संख्यावाढीसाठी वाव आहे. भविष्यामध्ये या कोंबडीच्या गुणविशेषांचा प्रसार, प्रचार व बाजारपेठेची उपलब्धतेसाठी प्रयत्न केले जातील, असा सूर यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केला.

खरंतर ही गावरान जात आहे. खूप पौष्टिकता आणि सात्त्विकता जपणारी ही सातपुडा देशी कोंबडी. तिच्या गुणधर्मामुळेच तिने प्रदर्शन जिंकले आहे.

  • -डॉ. शामकांत पाटील,
    उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, जळगाव.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार