जळगाव : – सध्या महाराष्ट्रात रेल्वे अपघात झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच धुळ्यातून चाळीसगावकडे येणार्या ट्रेनखाली आल्याने आठ पाळीव जनावरांचा जागीच चिरडून मृत्यू झाला तर गुराखीदेखील ठार झाला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी सव्वा चार वाजता राजमाने स्थानकापासून काही अंतरावरील शिदवाडी गावाजवळ घडली. या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून राजेंद्र भीमराव सूर्यवंशी (वय ५०, शिदवाडी) असं दुर्घटनेतील मृत गुराख्याचं नाव आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, धुळ्याकडून निघालेली मेमू ट्रेन ०१३१० ही चाळीसगावकडे निघाल्यानंतर खांबा किलोमीटर ३४४ जवळ गुरांचा कळप रेल्वे रूळावर आल्यानंतर मेमूची जबर धडक बसल्याने दोन गायी, दोन बैल, दोन म्हशी, वासरू, पारडू अशी आठ जनावरे चिरडून मृत झाली तर गुराखी राजेंद्र सूर्यवंशी हेदेखील ठार झाले. रेल्वेगाडीच्या जबर धडकेने काही जनावरे रेल्वे रुळापासून लांब फेकली गेली तर काही जनावरे रेल्वेखाली अडकली. अपघातानंतर सुमारे तासभर मेमू गाडी घटनास्थळी थांबून होती. रेल्वेखाली अडकलेली जनावरे काढल्यानंतर गाडी चाळीसगावकडे रवाना करण्यात आली.
दिव्यांग सालदाराचं कुटुंब उघड्यावर
सूत्रांच्या माहितीनुसार, रेल्वे गाडीच्या धडकेने मृत झालेली जनावरे शिदवाडी येथील प्रतापसिंग वजेसिंग जाधव यांच्या मालकीची होती व त्यांच्याकडे सालदार म्हणून राजेंद्र भीमराव सूर्यवंशी हे कामास होते. रेल्वे पटरीवर गुरे गेल्याने आणि समोरून रेल्वे येत असल्याने सूर्यवंशी हे गुरे हाकण्यासाठी धडपड करीत असतानाच दुर्देवाने तेही रेल्वेखाली सापडून ठार झाले. सूर्यवंशी हे एका हाताने अपंग होते व ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेले होते व तेथून येऊन ते पुन्हा मूळ मालकाच्या शेतात कामासाठी बुधवारपासून रूजू झाले होते. पहिल्याच दिवशी त्यांच्या दुर्देवी मृत्यूने त्यांचं कुटुंब उघड्यावर आलं आहे. मृत राजेंद्र यांच्या पश्चात पत्नीसह मुलगा व मुलगी असा परीवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब निराधार झालं आहे. या घटनेत प्रतापसिंग जाधव यांच्या मालकीचे सर्व पशुधन ठार झाल्याने सुमारे पाच लाखांचा फटका त्यांना बसला आहे.
रेल्वे गाडीने गुरे चिरडल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. काही क्षण भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मेहुणबारे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण व सहकार्यांनी धाव घेतली. दरम्यान घटनेनंतर धुळे-चाळीसगाव मेमू सुमारे तासभर शिदवाडी येथेच थांबून होती. त्यानंतर ती जामदा रेल्वे स्थानकावर नेण्यात आली व पुढे चाळीसगाव रेल्वे स्थानकावर आणण्यात आली.
हे वाचलंत का ?
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४