IPLधमाकेदार सुरुवात, चेन्नई सुपर किंग्जवर गुजरात टायटन्सचा सलग तिसरा विजय,ऋतुराजची खेळी व्यर्थ

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गतविजेत्या गुजरात टायटन्सने आयपीएलची स्पर्धेच्या १६ व्या हंगामाची धमाकेदार सुरुवात केली. त्यांनी शुक्रवारी (३१ मार्च) स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात चार वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा पाच गडी राखून पराभव केला. गुजरातचा चेन्नईविरुद्धचा हा सलग तिसरा विजय आहे. गेल्या मोसमात त्यांनी चेन्नईचा दोनदा पराभव केला होता. चेन्नईला अजूनही गुजरात विरुद्ध पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.

गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्जने २० षटकात ७ विकेट गमावत १७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १९.२ षटकांत ५ बाद १८२ धावा करत सामना जिंकला. राशीद खानला गोलंदाजी करताना दोन विकेट्स घेतल्याबद्दल आणि नाबाद १० धावा काढल्याबद्दल सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

शुभमन गिलने ३६ चेंडूत ६३ धावा करत गुजरातला विजयाच्या समीप आणले. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि तीन षटकार मारले. त्याने एका बाजूने विकेट पडू दिली नाही. शुभमनने वृद्धिमान साहासोबत पहिल्या विकेटसाठी ३७ धावांची, साई सुदर्शनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची, कर्णधार हार्दिकसोबत तिसऱ्या विकेटसाठी २१ धावांची आणि विजय शंकरसोबत चौथ्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी केली. विजय शंकरने २१ चेंडूत २७ धावा, वृद्धिमान साहाने २१ चेंडूत २५ धावा आणि साई सुदर्शनने १७ चेंडूत २ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पंड्या आठ धावा करून बाद झाला. राहुल तेवतियाने १४ चेंडूत १५ आणि राशीद खानने तीन चेंडूत १० धावा केल्या. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी आठ चेंडूत २६ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. चेन्नईकडून राजवर्धन हंगरगेकरने तीन बळी घेतले. त्याचवेळी रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडे यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ९२ धावा केल्या. त्याच्याशिवाय मोईन अलीने २३ धावांची खेळी केली. धोनीने अखेरच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार ठोकत संघाची धावसंख्या सात बाद १७८ पर्यंत नेली. त्याने सात चेंडूत १४ धावा केल्या. गुजरातकडून राशिद खान, अल्झारी जोसेफ आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी जोशुआ लिटलला एक विकेट मिळाली.

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये धोनी-धोनीचा आवाज सतत ऐकू येत होता. १८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रवींद्र जडेजा बाद झाल्यानंतर तो क्रीझवर उतरला. त्याने शेवटच्या षटकात जोशुआ लिटलच्या चेंडूवर एक षटकार आणि एक चौकार मारला. धोनीने सात चेंडूत नाबाद १४ धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट २०० होता. धोनीने २०व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला तेव्हा संपूर्ण स्टेडियम आनंदलं होतं.

चेन्नईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे हा स्पर्धेच्या इतिहासातील पहिला ‘इम्पॅक्ट प्लेयर’ ठरला. अनुभवी फलंदाज अंबाती रायडूच्या जागी गोलंदाजी करताना त्याला वगळण्यात आले. मात्र, तुषारची गोलंदाजी काही खास नव्हती. त्याने केवळ ३.२ षटकात ५१ धावा वाटल्या. अर्थात गोलंदाजी करताना अर्धशतक झळकावलं. त्याला फक्त एक विकेट घेता आली. गुजरातने साई सुदर्शनला इम्पॅक्ट प्लेयर बनवले. सुदर्शनने अनुभवी केन विल्यमसनची जागा घेतली. विल्यमसनला दुखापतीमुळे फलंदाजी करता आली नाही.

हे देखील वाचा

टीम झुंजार