रामनामाच्या जय घोषकरत करणखेड्यात श्रीराम जन्मोत्सव रथोत्सवाने साजरा.

Spread the love

रामनवमी निमित्त भक्तिमय वातावरणात पारंपरिक वाद्यांनी शेकडो भाविकांची गर्दीने रथाची निघाली मिरवणूक

गौरवकुमार पाटील | अमळनेर

महाराष्ट्रातील तिसरे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणारे व पुरातन काळापासून चालत येणाऱ्या पाडळसरे येथून जवळच असलेल्या करणखेडे येथील श्रीविठ्ठल मंदिर संस्थानच्या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सालाबाद प्रमाणे श्रीराम नवमीनिमित्त मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात पारंपरिक वाद्यांनी भगव्या पताका फिरवून शेकडो वर्षाची परंपरा कायम ठेवून श्रीराम नामाचा गजर करत ,रामलक्ष्मण जानकी ,जयबोलो हनुमान की म्हणत रथाची भव्यदिव्य मिरवणुक काढत श्रीराम जन्मोत्सव व रथोत्सव साजरा करण्यात आला. प्रथमता मंदिराचे पुजारी हेमंत कुलकर्णी व त्यांचे सहकारी पुरोहितांनी पुरातन विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातून मंत्रोच्चार करत बालाजी महाराजांच्या ताम्रमूर्तीस लाकडी अश्वारूढ रथात विराजमान केले.

यावर्षी रथाची प्रथम महापूजा व आरतीचे मानकरी धुळे येथील एच.डी.एफ.सी. बँक प्रबंधक व गावाचे सुपुत्र रमाकांत पाटील व प्रियंका पाटील यांच्या हस्ते रथावर आसनस्थ झालेल्या बालाजी महाराजांची व रथाची पूजा व महाआरती झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता ‘राजाधिराज प्रभूरामचंद्रजी महाराज की जय’ या नामघोषात सवाद्य रथाच्या मिरवणुकीस सुरुवात झाली.
तत्पूर्वी संस्थांच्या रितीरिवाजाप्रमाणे रथाच्या महापूजेचे मानकरी रमाकांत पाटील व प्रियंका पाटील यांचा संस्थांच्या वतीने सत्कार करणखेड्याच्या सरपंच कविताबाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यात्रोत्सवात उपस्थित असलेले तालुक्याचे माजी आमदार शिरीष चौधरी व जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.या यात्रोत्सवात बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे व पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील यांचा सत्कार महिला पोलीस पाटील शांताबाई पाटील यांनी केला. यात्रोत्सवात सालाबाद प्रमाणे संस्थानात विविध सेवा देणाऱ्या भक्तांचा संस्थांच्या वतीने श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

पुढे माऊली प्रसाद भजनी मंडळाचे भजनी मंडळ हरिनामाचा जयघोष करत मार्गस्थ झाल्यानंतर रथ संस्थांनातून मार्गस्थ झाला. रथ मार्गात भाविक मोठ्या भावनेने रथाच्या चाकाखाली श्रीफळ अर्पण करून आपल्या मनोकामना बोलत होते .नवसपूर्तीचा वेगळा अनुभव भाविकांची गर्दीत पाहायला मिळाला , “रामलक्ष्मण जानकी ,जय बोलो हनुमान की ” म्हणत भाविकांनी रथ ओढण्याचा आनंद घेतला .
संपूर्ण गावात रथाची ढोल-ताशांच्या गजरात वाजत- गाजत मिरवणूक व पूजा-अर्चना झाल्यानंतर रथ बोरी नदीच्या मार्गे पैलतिरी मुडी गावात गेल्यानंतर त्या ठिकाणी मुडी ग्रामस्थांतर्फे पूजा -अर्चना, भजन, भारुड व नारळ वाहिल्यानंतर रथ पुन्हा बोरी नदीच्या वाळवंटांमधून मार्गस्थ होत या दोन्ही गावांची प्रदक्षिणा पूर्ण करून रात्री उशिरा करणखेडे येथील विठ्ठल मंदिर संस्थांच्या रथगृहात विसावला ,रथाच्या मागे लाकडी मेण्यात श्रीरामचंद्रांच्या पादुका विराजमान होत्या व सोबत संस्थांचे गादी पुरुष ह.भ.प.प्रल्हाद महाराज यांनी पायी परिक्रमा केली .

रथाच्या उजव्या चाकाच्या मोगरीचे मानकरी गावातीलच सोनवणे परिवाराला व रथाच्या डाव्या चाकाच्या मोगरीचा मान लोहार परिवाराला मिळाला. तिसरे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या या यात्रोत्सवात दरवर्षी धुळे जळगाव जिल्ह्यातील भाविक भक्तांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती असते. यात्रेत खाद्य खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल व खेळण्यांच्या दुकानांसह संसार उपयोगी वस्तूंची विविध दुकाने थाटली होती. या यात्रोवात संसार उपयोगी वस्तूंची महिला भगिनी कडून मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.
३ एप्रिल रोजी सकाळी पाच वाजेला पालखी व वहन मिरवणुकीस सुरुवात होऊन करणखेडेसह बोरी नदी पात्रातून पालखी मुडी येथे जाणार आहे. तेथून पुन्हा बोरी नदी पात्रा मार्गे संस्थानात पालखीचे आगमन झाल्यानंतर सकाळी दहा वाजता ह.भ.प. जगन्नाथ महाराज बागले यांच्या काल्याच्या कीर्तनाने रथोत्सवाची सांगता होणार आहे.

रथोत्सवात काहीही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडला असून उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाने मारवड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच होमगार्ड जवानांसह जळगाव येथील दृत कार्यबलाचे जवान यांनी रथोत्सवात चोख बंदोबस्त ठेवला होता.

हे देखील वाचा

टीम झुंजार