शांतता प्रस्थापित होण्यासाठी दोन्ही समाजाकडून प्रयत्न न झाल्याने घटना घडली. ना.गुलाबराव पाटील

Spread the love

पाळधी येथे शांतता समितीची बैठक संपन्न, 5 एप्रिल पर्यन्त साय.5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत संचारबंदी.

धरणगाव :- जळगांव येथून वणी गडावर जाणाऱ्या दींडीवर दगडफेक झाली या वेळी दोन्ही समाजातील नेत्यांनी शांतते साठी प्रयत्न केले असते तर पुढचा अनर्थ टळला असता असे प्रतिपादन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले.
येथे झालेल्या दगडफेक प्रकरणी आज संचारबंदीशिथिल झाल्यानंतर शांतता कमिटीची बैठक झाली. या वेळी दोन्ही समाजातील नागरिकांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी काहींनी प्रशासनावर आरोप केले. या वेळी दिंडीतील लोक निघून गेले त्या नंतर गाड्यांची तोडफोड कोणी केली? जळगावचा दिंडीत पाळधीचे कोणी नव्हते मग हा उपद्रव करणारा कोण?

त्यांना त्या त्या समाजातील नेत्यांनी आवरले असते तर ही वेळ आली नसती अशी भूमिका माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी मांडली.प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी शांत असलेल्या गावात अशी घटना का घडली? हया घटनेमुळे गावाचे नाव खराब झाले. प्रशासनाला नाईलाजाने खंबीर भूमिका घ्यावी लागली असे सांगितले.तर चोपडा भागाचे उप विभागीय अधिकारी रावले यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना आमची माणसे काम करत असताना आमच्या अंगावर ट्रक घालण्यात आला.महीला पोलिसांवर मिरची पावडर फेकण्यात आली.आरोपी कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे तुम्ही आरोपी पकडुन द्या आणि कठोर कारवाई टाळा असे सांगितले.चाळीसगाव भागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी सांगितले की,प्रशासन हे कोणा विरोधात नाही परंतु गुन्हेगारांना सोडले जाणार नाही. सी सी टी वी फुटेज उपलब्ध असून त्या नुसार उपद्रवी लोकांवर कारवाई केली जाईल.

निरपराध असलेल्यांवर कोणतीच कारवाई करण्यात येणार नाही.मात्र प्रशासनाला नाईलाजाने खंबीर भूमिका घेण्यास भाग पाडू नका.येणारे उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी बोलताना पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले की,दिंडीत कोणी गावाच्या नागरिक नव्हता. बाहेरगावची दिंडी येते आणि त्यावर दगडफेक करून गाड्या फोडण्यात येतात ही काही चांगली लक्षणे नसून या मुळे गावाची अपरिमित हानी झाली असून या मुळे गाव मागे पडेल.आपण मागील दंगलीची झळ पाहिली आहे आताच्या तरुण रक्ताला ती झळ बसलेंली नाही. गावातील या अप्रिय घटनेने गावचा विकास ही थांबेल.गेली ३३ वर्ष आपण एकोप्याने राहिलो मग असे कण्यामागे नेमके कारण काय? दोन्ही समाजातील नेत्यांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर आज ही वेळ आली नसती असे सांगून आता येणारे सण एकत्रित पणे साजरे करण्याचे आवाहन केले.

या वेळी यासीन खान,नईम देशपांडे,अरुण पाटील,सचिन महाले आदिनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, चाळीसगाव चे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, प्रांताधिकारी विनय गोसावी, चोपडा भागाचे उप विभागीय अधिकारी कृशीकेश रावले, धरणगावचे पो. नि.अरुण ढमाले, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, जि. प.सदस्य प्रतापराव पाटील,उद्योजक दिलीप पाटील, प्रकाश पाटील,शरद कोळी,ग्रामविकास अधिकारी दिपक पाठक आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक स. पो. नि.प्रमोद कठोरे तर सुत्र संचलन गोकुळ पाटील यांनी केले.शांतता सभेला गावातील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी दिनांक 5 एप्रिल पर्यंत सायंकाळी 5 वाजेपासून सकाळी 10 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील तसेच 10 वाजेनंतर 5 वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल राहील असा आदेश देण्यात आला आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार