गावठी कट्टा व जिवंत काडतूस घेवून दरोड्याच्या तयारीत असलेल्यास एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात.

Spread the love

जळगाव : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एकाला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली आहे. आशुतोष सुरेश मोरे असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
त्याचे इतर साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले असले तरी त्यांना लवकरच पकडले जाणार असल्याची माहिती या गुन्ह्याचे तरुण तडफदार तपास अधिकारी पोलिस उप निरीक्षक आनंदसिंग पाटील यांनी क्राईम दुनिया सोबत बोलतांना दिली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गु.र.न. 209/2023 भादवि कलम 399, 402 सह आर्म अॅक्ट 3/25, मु.पो. अधिनियम कलम – 37[13] चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे अभिलेख्यावरील गुन्हेगार विशाल राजु अहिरे (रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) व त्याचे साथीदार टोळीने दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना समजली होती. त्या माहितीची खात्री आणि पुढील कारवाई करण्याकामी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथक रवाना झाले होते. 4 एप्रिलच्या रात्री साडे अकरा वाजता मेहरुण स्मशानभूमीजवळ असलेल्या बगीच्यानजीक विशाल राजू अहिरे, आशुतोष सुरेश मोरे(रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी जळगाव), गोपाल चौधरी, दिक्षांत उर्फ दादु सपकाळे, शुभम धोबी असे सर्व जण टोळीने हजर होते. दरोडा टाकण्याची तयारी सुरु असतांनाच पोलिस पथक आपल्या मागावर आल्याची खात्री टोळीला झाली. सुगावा लागल्याने सर्व जण पळून जावू लागले.

पोलिस उप निरीक्षक आनंदसिंग पाटील व त्यांच्या सहका-यांनी सर्वांचा सिनेस्टाईल पाठलाग सुरु केला. आशुतोष सुरेश मोरे हा पोलिस पथकाच्या हाती लागला असला तरी त्याचे इतर साथीदार मोटार सायकलने पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. पोलिस उप निरीक्षक आनंदसिंग पाटील, पोहेकॉ जितेन्द्र राजपुत, पोहेकॉ महेंन्द्र पाटील आदींनी पाठलाग करुन आशुतोष मोरे यास पकडले. त्याच्या कब्जातून एक गावठी कट्टा व एक जीवंत काडतुस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक आनंदसिंग पाटील यांच्यासह पोहेकॉ जितेन्द्र राजपुत, पोहेकॉ महेंन्द्रसिंग पाटील, पोलिस नाईकबडगुजर, विकास सातदीवे, योगेश बारी, पो. कॉ. ललित नारखेडे, चंद्रकांत पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील आरोपी आशुतोष मोरे यास न्या. श्रीमती जानव्ही केळकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 10 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार