महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्यात उष्माघातामुळे 11 जणांचा मृत्यू,15 जण आयसीयूत भरती

Spread the love

नवी मुंबई :- खारघर येथे आयोजित आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या सुमारे 11 जणांना उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे जीव गमवावा लागला आहे.तसेच 15 जण गंभीर असून त्यांना आयसीयूत भरती करण्यात आले आहे. यापैकी काहींना खारघर सेंट्रल पार्कजवळील टाटा हॉस्पिटलमध्ये, तर काहींना पनवेल परिसरातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे आप्पा साहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषणने सन्मानित करण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्य सहभागी झाले होते.

कार्यक्रमादरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी व्यासपीठावरून उष्णतेचा उल्लेख केला होता, तरीही लोकांना उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. तापमान ४२ अंशांच्या आसपास होते ज्याचा उल्लेख खुद्द अमित शहा यांनी आपल्या भाषणामध्ये केला होता. लाखोंच्या जमावामुळे वातावरणातील आर्द्रता आणखी वाढली होती. त्यातच कार्यक्रम संपताच चेंगराचेंगरी देखील झाली.
जवळपास १५ ते २० लाख लोक या कार्यक्रमासाठी आले होते. गेल्या दोन दिवसांपासून धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण सन्मानासाठी लोक खारघर येथे येऊ लागले होते. या कार्यक्रमासाठी भलेमोठे मैदान लोकांनी खच्चून भरले होते. त्याबाहेरही लोक गोळा झाले होते. रणरणत्या उन्हात लोकांनी हा कार्यक्रम पाहिला.

मृत पावलेल्या व्यक्तींची नावे
खारघर येथील सोहळ्यात उपस्थित राहिलेल्या आणि उष्माघातामुळे मृत पावलेल्यांपैकी 8 महिला असून, 3 पुरुष आहेत. एकूण 11 मृतदेह पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय पनवेल नेण्यात आले होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
1) महेश नारायण गायकर (वय 42, गाव- वडाळा, मुंबई, मूळ गाव – म्हसळा मेहंदडी)
2) जयश्री जगन्नाथ पाटील (वय 54, गाव – म्हसळा, रायगड)
3) मंजुषा कृष्णा भोंबंडे (वय 51, गाव – गिरगाव मुंबई मुळगाव श्रीवर्धन)
4) स्वप्निल सदाशिव केणी (वय 30, गाव – शिरसाटबामन पाडा विरार)
5) तुळशीराम भाऊ वांगड (वय 58, गाव -जव्हार पालघर)
6) कलावती सिद्राम वायचळ (वय 45, गाव – तोडकर आळी सोलापूर)
7) संगीता संजय पवार (गाव – मंगळवेढा सोलापूर)
8) भीमा कृष्णा साळवे (वय 58, गाव – कळवा ठाणे)
उर्वरित तीन मृतांमध्ये महिला असून, त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही, अशी माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिली.

बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांनी “हरवले व सापडले” समितीचे प्रमुख ७९७७३१४०३१ व तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास ०२२-२७५४२३९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टीम झुंजार