मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२३ ने अर्धा टप्पा पार केला आहे. सर्व संघांनी सात सामने खेळले आहेत. चेन्नई आणि गुजरातचे १० गुण आहेत, तर चार संघांचे आठ गुण आहेत. एका संघाने सहा तर तीन संघांनी चार गुण मिळवले आहेत. गुजरात टायटन्सने त्यांच्या सातव्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ५५ धावांनी पराभव केला आणि या हंगामात १० गुण मिळवणारा दुसरा संघ ठरला. यासह गुजरातने गुणतक्त्यात चेन्नईची बरोबरी करत प्लेऑफमधील आपला दावा मजबूत केला आहे. गुणतक्ता्यातत गुजरात आणि चेन्नईचे समान १० गुण आहेत, पण चांगल्या धावगतीच्या आधारावर चेन्नईचा संघ अव्वल स्थानावर आहे. सलामीवीर शुभमन गिल (५६), नूर अहमद (३/३७) आणि रशीद खान (२/२७) यांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर गुजरात टायटन्सने पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा ५५ धावांनी पराभव केला.
गिलच्या अर्धशतकानंतर गुजरात टायटन्सने मधल्या आणि खालच्या फळीतील फलंदाजांच्या मोठ्या फटक्यांच्या जोरावर ६ बाद २०७ धावा केल्या. डेव्हिड मिलरने २२ चेंडूत ४६ धावा केल्या. राहुल तेवतियाने पाच चेंडूत नाबाद २० धावा केल्या आणि अभिनव मनोहरने २१ चेंडूत ४२ धावा केल्याच शिवाय मिलरसोबत पाचव्या विकेटसाठी ७१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही केली.
गुजरातने दमदार गोलंदाजी केल्यामुळे मुंबईला २० षटकांत नऊ गडी गमावून १५२ धावा करता आल्या. नूर आणि रशीदशिवाय मोहित शर्मा (२/३८) आणि हार्दिक पांड्या (१/१०) यांनीही विकेट्स घेतल्या. मुंबईच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली आणि कर्णधार रोहित शर्मा दोन धावा काढून बाद झाला. मात्र, अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने २६ चेंडूत ३३ धावा करत संघाला सुरुवातीच्या धक्क्यातून बाहेर काढले. त्याने तीन षटकार मारले. मात्र तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव (२३) आणि टीम डेव्हिड (०) यांनीही तंबूची वाट धरली आणि संघाची धावसंख्या पाच बाद ५९ अशी झाली.
निहाल खेळत असताना त्याने संघाच्या विजयाची छोटीशी आशा निर्माण केली होती. तो आक्रमक पद्धतीने खेळत होता. त्याने पियुष चावलासोबत २४ चेंडूत ४५ धावांची भागीदारी केली. मात्र, पियुष धावबाद झाला आणि त्यानंतर मोहित शर्माने निहालला शमीकडे झेल देण्यास भाग पाडले. निहालने २१ चेंडूत ४० धावा केल्या आणि ३ चौकार आणि षटकार ठोकले. महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने ९ चेंडूत १३ धावा केल्या ज्यात एका षटकाराचा समावेश आहे.
तत्पूर्वी, मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युवा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने पहिल्या षटकात फक्त चार धावा दिल्या. डावाच्या तिसऱ्या षटकात अर्जुनने वृद्धीमान साहा (४)ला झेलबाद केल्याने मुंबईला त्यांची पहिली विकेट लवकर मिळाली. ज्युनियर तेंडुलकरने या षटकात पाच धावांत एक बळी घेतला. त्याने दोन षटकांत नऊ धावा दिल्या. गेल्या सामन्यात त्याने तीन षटकात ४८ धावा दिल्या आणि चांगले पुनरागमन केले.
पहिल्या पाच षटकात गिलची बॅट शांत होती पण त्यानंतर कॅमेरून ग्रीनच्या षटकात त्याने १७ धावा काढल्या. पॉवरप्लेमध्ये गुजरातने एका विकेटवर ५० धावा केल्या. गतविजेत्या गुजरातला पीयूष चावला (२/३४) याने कर्णधार हार्दिक पांड्याला १३ धावांवर झेलबाद केले. गिलला कुमार कार्तिकेयने पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.
टायटन्सने ९१ धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. शुभमनने या खेळीत सात चौकार आणि एक षटकार लगावला. विजय शंकर १६ धावा करून बाद झाला. यानंतर अभिनव मनोहर आणि मिलर यांनी चांगली भागीदारी रचली. चावलाच्या षटकात मनोहरने १७ धावा काढल्या. त्यानंतर ग्रीनच्या १८व्या षटकात मनोहर आणि मिलरने २२ धावा जोडल्या. या षटकात तीन षटकार मारले गेले. पुढच्या म्हणजे १९व्या षटकात मनोहरला रिले मेरेडिथने बाद केले. शेवटच्या षटकात तेवतियाने दोन षटकार मारत धावसंख्या २०० पार नेली.
अभिनव मनोहरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले