अमळनेर: येथील दाजीबानगरमधील अक्षय भिल याच्या खुनाच्या निषेधार्थ तालुक्यातील भिल्ल समाज एकवटला व आरोपींना आमच्यासमोर हजर करा, फाशी द्या, एनकाउंटर करा म्हणत तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.जोरात गाणे वाजविण्याच्या कारणावरून दाजीबानगर परिसरात दोन कुटुंबात वाद होऊन त्यातून एकाचा खून व एकाला गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी (ता.२४) रात्री घडली. अक्षय राजू भिल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मंगळवारी (ता. २५) सकाळी संतप्त भिल्ल समाज शहराच्या विविध कानाकोपऱ्यातून व तालुक्यातून एकत्र येत तहसील कार्यालयाजवळ रस्ता रोको केला.
खुनातील आरोपींना आमच्यापुढे हजर करा म्हणत जमाव संतापला आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना अडवत किरकोळ दगडफेक केली. घटनास्थळी डीवायएसपी राकेश जाधव, प्रभारी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, प्रभारी तहसीलदार अमोल पाटील, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, उपनिरीक्षक गंभीर शिंदे, उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, उपनिरीक्षक विकास शिरोळे यांच्यासह विविध अधिकारी व पोलिस कर्मचारी हजर झाले.
सर्व संशयिताना अटक करण्यात आली आहे, असे सांगूनही जमाव ऐकायला तयार नव्हता. त्यानंतर जमावाने महाराणा प्रताप चौकाचा ताबा घेत तिन्ही बाजूने वाहतूक बंद केली. तीन चार ठिकाणी टायर जाळण्यात आले.
विविध संघटना पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यावरही आंदोलनकर्ते संशयिताना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्या कुटुंबाला आमच्या कॉलनीतून हाकलून द्या, अशीही मागणी केली. अखेरीस चार, पाच जणांच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी संशयिताना अटक केल्याचे दाखविल्यानंतर व कठोर कारवाईचे निवेदन देऊन आंदोलन निवळले.
मुख्य धुळे रस्त्यावरची वाहतूक तीन तास बंद केल्याने सामान्य नागरिक व एसटी प्रवाशांचे हाल झाले. अतिक्रमणामुळे गावात जायला रस्तेच नसल्याने एसटी बस व मोठी वाहने लहान रस्त्याने जात होती. त्यामुळे एका एसटीला झाडाची फांदी लागून काच फुटला. वाहकाला दोषी धरण्यात आल्याने वाहक एसटी निमुळत्या रस्त्याने नेण्यास घाबरत होता. मोठ्या प्रमाणावर आंदोलन होऊनही लोकप्रतिनिधी फिरकले नाहीत, ते बाजार समितीच्या प्रचारात व्यस्त होते.
या संशयित आरोपींना केली अटक
रोहित चेतन सरोदे वय १९ ,राहुल नाना सरोदे वय २३ ,अर्जुन नाना सरोदे वय २५ ,नीता चेतन सरोदे वय ४५याना अक्षय मयत झाल्याचे कळताच ते धुळ्याला पळून गेले होते. प्रभारी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी ,पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे ,शरद पाटील , रवी पाटील ,दीपक माळी , सूर्यकांत साळुंखे , सिद्धांत शिसोदे यांनी धुळ्यात चितोडगड परिसरात आरोपी असल्याची माहिती घेऊन त्यांना तेथून ताब्यात घेतले आहे. तर दुसरी महिला आरोपी आरती नाना सरोदे वय ४८ ही महिला अमळनेरात असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे ,सुनील हटकर ,कपिल पाटील यांनी तिला पकडून आणले. डी वाय एस पी राकेश जाधव यांनी आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे.
हे देखील वाचा
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






