मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२३ च्या ४४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा पाच धावांनी पराभव केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २० षटकांत आठ गडी गमावून १३० धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाला २० षटकांत ६ गडी गमावून १२५ धावा करता आल्या. या विजयानंतरही दिल्लीचा संघ गुणतक्त्यात शेवटच्या स्थानावर म्हणजेच दहाव्या स्थानावर आहे. नऊ सामन्यांत तीन विजय आणि सहा पराभवांसह त्यांचे सहा गुण आहेत. त्याचबरोबर गुजरात संघाचा या मोसमातील हा तिसरा पराभव ठरला. हार्दिकच्या संघाने आतापर्यंत नऊपैकी सहा सामने जिंकले आहेत आणि १२ गुणांसह गुणतक्त्यात अव्वल स्थानावर आहे.
दिल्लीने या सामन्यात आपल्या सर्वात कमी धावसंख्येचा बचाव केला. या मोसमाच्या सुरुवातीला त्यांनी १४४ धावा वाचवल्या होत्या. त्याचवेळी, धावांचा पाठलाग करताना गुजरातचा आयपीएलमधील हा दुसरा पराभव आहे. संघाने लीगमध्ये आतापर्यंत १४ सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग केला आहे. यापैकी गुजरातने १२ सामने जिंकले आहेत.
शेवटच्या तीन षटकात गुजरातला विजयासाठी ३७ धावांची गरज होती. त्यावेळी हार्दिक पंड्या आणि अभिनव मनोहर खेळपट्टीवर होते. १८व्या षटकात खलील अहमद गोलंदाजीसाठी आला. त्याने पहिल्याच चेंडूवर अभिनव मनोहरला बाद केले. या षटकात खलीलने चार धावा दिल्या. गुजरातला शेवटच्या दोन षटकात ३३ धावांची गरज होती. राहुल तेवतिया हार्दिकसोबत फलंदाजीला आला. त्याचवेळी एनरिक नॉर्टजे गोलंदाजीसाठी आला. त्याने पहिल्या तीन चेंडूत तीन धावा घेतल्या. यानंतर तेवतियाने ओव्हरच्या शेवटच्या तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकले. नॉर्टजेने १९व्या षटकात २१ धावा दिल्या. अशा स्थितीत इशांत शर्मासमोर १२ धावा वाचवण्याचे लक्ष्य होते. इशांतने २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा दिल्या. दुसऱ्या चेंडूवर हार्दिकने एकच धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर तेवतियाला एकही धाव करता आली नाही. चौथ्या चेंडूवर इशांतने तेवतियाला रिले रुसोकरवी झेलबाद केले. सात चेंडूंत २० धावा करून तो बाद झाला. राशिद खानला पाचव्या चेंडूवर दोन धावा करता आल्या. त्याचवेळी रशीदने शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव घेतली. अशाप्रकारे इशांतने केवळ सहा धावा केल्या आणि दिल्लीने पाच धावांनी सामना जिंकला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीची सुरुवात खूपच खराब झाली. दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या सहा षटकांतच पाच विकेट्स गमावल्या होत्या. पॉवरप्लेमध्ये संघाने पाच विकेट गमावण्याची यंदाच्या मोसमातील ही पहिलीच वेळ आहे. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने गुजरातला यश मिळवून दिले. त्याने फिलिप सॉल्टला डेव्हिड मिलरकरवी झेलबाद केले. सॉल्टला खातेही उघडता आले नाही आणि तो गोल्डन डकचा बळी ठरला. यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर दुसऱ्याच षटकात धावबाद झाला. डावातील तिसऱ्या आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकात शमीने रिले रुसोला बाद केले. रुसोला सहा चेंडूंत आठ धावा करता आल्या. यानंतर शमीने तिसर्याच षटकात मनीष पांडे आणि प्रियम गर्गची विकेट घेतली. मनीषला एक तर प्रियमला १० धावा करता आल्या. दिल्लीने २३ धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. यानंतर अक्षर पटेलने सहाव्या विकेटसाठी अमन हकीम खानसोबत ५० धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलला मोहित शर्माने तंबूमध्ये पाठवले. त्याला ३० चेंडूत २७ धावा करता आल्या. यानंतर अमनने रिपल पटेलसोबत सातव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. अमनने आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ४१ चेंडूत झळकावले. त्याने षटकारासह अर्धशतक पूर्ण केले. अमन ४४ चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५१ धावा करून बाद झाला. राशिद खानने त्याला तंबूमध्ये पाठवले. रिपल १३ चेंडूत २३ धावा करून बाद झाला. गुजरातकडून शमीने चार षटकात ११ धावा देत चार बळी घेतले. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट २.८० होता. मोहित शर्माने दोन गडी बाद केले. त्याचवेळी राशिद खानने एक विकेट घेतली.
१३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवातही खराब झाली. शून्यावर वृद्धिमान साहाच्या रूपाने संघाने पहिली विकेट गमावली होती. साहाला खातेही उघडता आले नाही. यानंतर शुबमन गिल आणि विजय शंकर हे दोन फलंदाज सहा धावा करून बाद झाले. डेव्हिड मिलरला खातेही उघडता आले नाही. हार्दिक पंड्या आणि अभिनव मनोहर यांनी पाचव्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. मनोहर २६ धावा करून तर राहुल तेवतिया २० धावा करून बाद झाला. मनोहरने आपल्या डावात एक षटकार तर तेवतियाने तीन षटकार ठोकले. हार्दिकने ५३ चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने नाबाद ५९ धावा केल्या, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. दिल्लीकडून खलील अहमद आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी एनरिक नॉर्टजे आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
मोहम्मद शमीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.