मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२३ मधील त्यांच्या ११व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सहा विकेट्सने पराभव केला. या विजयासह चेन्नई संघ १३ गुणांसह गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर मुंबईचा संघ १० सामन्यांत पाच विजय आणि पाच पराभवांसह सहाव्या स्थानावर आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने आठ गडी गमावून १३९ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईने १७.४ षटकांत ४ गडी गमावून १४० धावा केल्या आणि १४ चेंडू शिल्लक असताना सहा विकेट्स राखून सामना जिंकला.
या सामन्यात मुंबईकडून नेहल वढेराने ६४ धावा केल्या. त्याचवेळी चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने ४४ आणि ऋतुराजने ३० धावा केल्या. चेन्नईच्या मथिशा पाथिरानाने गोलंदाजीमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आणि तीन विकेट घेतल्या. त्याचवेळी तुषार देशपांडे आणि दीपक चहर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मुंबईकडून पियुष चावलाने दोन बळी घेतले. ट्रिस्टन स्टब्स आणि आकाश मधवाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. या विजयामुळे या हंगामात या दोन्ही संघांमधील दोन्ही सामने चेन्नईने जिंकले आहेत.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली. या सामन्यात कर्णधार रोहितने सलामीची जोडी बदलली. कॅमेरून ग्रीनने इशान किशनसह डावाला सुरुवात केली, मात्र चार चेंडूंत सहा धावा करून तो देशपांडेचा बळी ठरला. यानंतर दीपक चहरने एका षटकात दोन बळी घेत मुंबईची धावसंख्या १४ धावांत तीन अशी कमी केली. दीपक चहरने सात धावांवर ईशान किशनला तिक्षनाकरवी झेलबाद केले. त्याचवेळी शून्य धावांवर रोहितला जडेजाने झेलबाद केले. रोहित शर्मा आयपीएलमध्ये १६व्यांदा खाते न उघडताच बाद झाला. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेला तो फलंदाज आहे. या विक्रमात त्याच्यापाठोपाठ सुनील नरेन, मनदीप सिंग आणि दिनेश कार्तिक यांचा क्रमांक लागतो. हे तिन्ही खेळाडू १५ वेळा आयपीएलमध्ये खाते न उघडताच बाद झाले आहेत.
सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत मुंबई संघाची सूत्रं ताब्यात घेतली. दोघांनी मुंबईची धावसंख्या १४/३ वरून ६९/४ वर नेली. अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर ही जोडी धोकादायक दिसत होती, मात्र जडेजाने सूर्यकुमार यादवला वैयक्तिक २६ धावांवर त्रिफळाचीत केले. यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि नेहल वढेरा यांनीही अर्धशतकी भागीदारी केली. यादरम्यान नेहलने ४६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. ५१ चेंडूत ६४ धावा करून तो मथिशा पाथिरानाचा बळी ठरला. त्याची विकेट पडल्याने मुंबईची धावसंख्या १२३/५ झाली. यानंतर मुंबईने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. टीम डेव्हिड दोन आणि अर्शद खानने एक धावा काढून बाद झाला. त्याचवेळी ट्रिस्टन स्टब्स २१ चेंडूत २० धावा करून बाद झाला. चेन्नईकडून मथिशा पाथिरानाने सर्वाधिक तीन बळी घेतले. दीपक चहर आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली. मोईन अली वगळता चेन्नईच्या सर्व गोलंदाजांचा इकॉनॉमी रेटही चांगला होता.
या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून १० खेळाडूंनी फलंदाजी केली, परंतु त्यापैकी सात खेळाडूंनी दुहेरी आकडाही गाठला नाही. नेहल वढेराने सर्वाधिक धावा (५१ चेंडूत ६४) केल्या. त्याच्याशिवाय फक्त सूर्यकुमार यादव (२२ चेंडूत २६ धावा) आणि ट्रिस्टन स्टब्स (२१ चेंडूत २० धावा) यांना दुहेरी आकडा गाठता आला. ग्रीन सहा धावा, इशान किशन सात धावा, टीम डेव्हिड दोन धावा आणि अर्शद खान एक धावा काढून बाद झाला. कर्णधार रोहितला खातेही उघडता आले नाही. त्याचवेळी जोफ्रा आर्चरने तीन धावा केल्यानंतर नाबाद राहिला आणि पियुष चावलाने दोन धावा केल्या.
१४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई संघाची सुरुवात चांगली झाली. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या. ऋतुराज १६ चेंडूत ३० धावा करून बाद झाला तेव्हा रहाणेसह कॉनवेने सुरेख धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये चेन्नईने एक गडी गमावून ५५ धावा केल्या होत्या आणि सामन्यात चांगली स्थिती गाठली होती. यानंतर रहाणे १७ चेंडूत २१ धावा करून बाद झाला आणि रायुडूने ११ चेंडूत १२ धावा केल्या, पण कॉनवे एक बाजू चिटकून राहिला. त्याने चेन्नईची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली आणि शिवम दुबेच्या साथीने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. कॉनवे ४२ चेंडूत ४४ धावा करून बाद झाला, मात्र तोपर्यंत चेन्नईचा विजय निश्चित झाला होता. शेवटी शिवम दुबे आणि महेंद्रसिंग धोनीने चेन्नईला विजय मिळवून दिला. दुबे १८ चेंडूत २६ धावा करून नाबाद राहिला आणि धोनीने तीन चेंडूत दोन धावा केल्या. मुंबईकडून पियुष चावलाने दोन बळी घेतले. त्याचवेळी ट्रिस्टन स्टब्स आणि आकाश मधवाल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
मथिशा पाथिरानाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.