पारोळा : लग्नात कमी हुंडा दिला या कारणासह स्वयंपाक येत नाही म्हणून तसेच माहेरून टाटा मॅजिक गाडी घेण्यासाठी दोन लाख रूपये घेऊन येत नसल्याने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला माहेरी टाकून घातल्याप्रकरणी भोंडण (ता.पारोळा) येथील सासरच्या सात जणांविरोधात येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, की पिंप्री बुद्रूक (ता. चाळीसगाव) येथील माहेर असलेल्या २२ वर्षीय विवाहितेचा भोंडण (ता. पारोळा) येथील अमोल दत्तू सोनवणे याच्याशी २०१८ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर पंधरा दिवस सुरळीत संसार चालल्यानंतर तिला स्वयंपाक येत नाही, धुणी धुता येत नाही अशा किरकोळ कारणावरून विवाहितेला शिवीगाळ करून तिचा छळ सुरू झाला.
अशातच लग्नात कमी हुंडा दिला असे बोलून तिने आता नवीन टाटा मॅजिक गाडी घेण्यासाठी माहेरून दोन लाख रूपये आणावेत, अशी मागणी सासरच्यांकडून होऊ लागली. मागणी पूर्ण होत नसल्याने विवाहितेला शिवीगाळ करून तिचा शारीरीक व मानसिक छळ होऊ लागला. अशातच पुढे मुलगी झाल्यानंतर हा छळ आणखीनच वाढला.विवाहिता माहेरुन दोन लाख रुपये आणत नसल्याने सासरच्यांनी तिला माहेरी पाठवून दिले. आज ना उद्या वागण्यात बदल होईल असे वाटल्याने विवाहितेने छळ सहन केला. एक दिवस तिला सासरच्यांनी घराबाहेर काढून दिल्यापासून ती माहेरी राहत आहे.
नांदण्याबाबत नातेवाईकांमार्फत वेळोवेळी समेट करून देखील सासरचे लोक ऐकण्यास तयार नसल्याने शेवटी विवाहितेने पोलिसात धाव घेतली. याबाबत विवाहितेच्या फिर्यादीवरून पती अमोल दत्तू सोनवणे, सासू रेखा दत्तू सोनवणे, सासरे दत्तू काशिनाथ सोनवणे, चुलत सासू मनीषा सिद्धार्थ सोनवणे, आजेसासू लिलाबाई धुकडू भालेराव, आतेसासरे रोहिदास निकम, लता रोहिदास निकम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम