मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२३ च्या ६० व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रविवारी (१४ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) त्यांचा ११२ धावांनी पराभव केला. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने २० षटकात ५ विकेट गमावत १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ १०.३ षटकांत ५९ धावांवर गारद झाला. आयपीएलच्या इतिहासातील हा त्यांचा सर्वात मोठा पराभव आहे.
राजस्थानसाठी शिमरॉन हेटमायर आणि जो रूट वगळता कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. हेटमायरने १९ चेंडूत ३५ आणि जो रूटने १५ चेंडूत १० धावा केल्या. राजस्थानच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. यामध्ये यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, रविचंद्रन अश्विन, केएम आसिफ आणि संदीप शर्मा यांचा समावेश आहे. संजू सॅमसन आणि देवदत्त पडिक्कल यांनी प्रत्येकी चार धावा केल्या. अॅडम झाम्पा दोन आणि ध्रुव जुरेल एक धाव काढून तंबूमध्ये परतले. मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालला बाद करून खळबळ उडवून दिली.
यानंतर आरसीबीच्या सर्व गोलंदाजांनी धोकादायक गोलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेच्या वेन पारनेलने तीन बळी घेतले. मायकेल ब्रासवेल आणि कर्ण शर्मा यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. सिराज आणि ग्लेन मॅक्सवेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.
याआधी कर्णधार फाफ डुप्लेसिसशिवाय ग्लेन मॅक्सवेलने आरसीबीसाठी अर्धशतक झळकावले. अखेरच्या षटकात अनुज रावतने वेगवान धावा करत संघाला १७० धावांच्या पुढे नेले. डुप्लेसिसने ५५ आणि मॅक्सवेलने ५४ धावा केल्या. अनुज रावतने ११ चेंडूत नाबाद २९ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारले. विराट कोहलीने १८ धावा केल्या. त्याने १९ चेंडूंचा सामना केला. कोहलीने या मोसमात सहा अर्धशतके झळकावली आहेत, मात्र राजस्थानविरुद्ध तो अपयशी ठरला. मायकेल ब्रासवेल नऊ चेंडूत नऊ धावा करून नाबाद राहिला. दिनेश कार्तिकचे खाते उघडले नाही आणि महिपाल लोमरोरला एकच धाव करता आली. राजस्थानकडून केएम आसिफ आणि अॅडम झाम्पाने प्रत्येकी दोन गडी बाद केले. संदीप शर्माला एक विकेट मिळाला.
या पराभवानंतर गतवर्षी अंतिम फेरीत पोहोचलेला राजस्थान संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या मार्गावर पोहोचला. ते सहाव्या स्थानावर घसरले. सहा विजय आणि सात पराभवानंतर १३ सामन्यांत त्यांचे १२ गुण आहेत. राजस्थानचा निव्वळ धावगती +०.१४० आहे. त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी १९ मे रोजी पंजाब किंग्जविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात मोठ्या विजयाची आवश्यकता असेल. यासोबतच इतर संघांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावे लागणार आहे.
आरसीबी या विजयाने प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहिले आहेत. त्यांचे १२ सामन्यांत १२ गुण झाले असून ते गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत. आरसीबीची निव्वळ धावगती +०.१६६ आहे. त्यांना १८ मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि २१ मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळायचे आहे. आरसीबी संघाने दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला तर ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात.
वेन पारनेलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
हे पण वाचा
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.
- यावल तालुक्यात शेत शिवारात कापूस वेचणी करतांना सर्पदंश झालेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४