IPL:कोलकाताने चेन्नईवर सहा विकेट्सने केली मात; रिंकू-नितीश झाले स्टार, चेन्नईचे फिरकी त्रिकूट बेकार

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२३ च्या ६१ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने सहा गडी गमावून १४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता संघाने १८.३ षटकांत चार गडी गमावून १४७ धावा केल्या आणि सामना जिंकला. या विजयासह कोलकाताचे १३ सामन्यांत १२ गुण झाले असून हा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. त्याचवेळी, पराभवानंतरही चेन्नईचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर कायम आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला शेवटचा सामना जिंकावा लागेल किंवा नशिबाची साथ लागेल.

या सामन्यात चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक नाबाद ४८ धावा केल्या. गोलंदाजीत दीपक चहरने तीन बळी घेतले. त्याचवेळी कोलकाताकडून रिंकू सिंगने ५४ आणि नितीश राणाने नाबाद ५७ धावा केल्या. गोलंदाजीत सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या चेन्नई सुपर किंग्जला ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३१ धावा जोडल्या. ऋतुराज १७ धावा करून बाद झाला. यानंतर रहाणेसह कॉनवेने संघाची धावसंख्या ५० धावांच्या पुढे नेली. पॉवरपेलमध्ये चेन्नईने एक गडी गमावून ५२ धावा केल्या. रहाणेने ११ चेंडूत १६ धावांची खेळी खेळली, पण त्यालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रहाणेनंतर कॉनवेही ३० धावा करून बाद झाला. यानंतर सुनील नरेनने अंबाती रायडू (चार धावा) आणि मोईन अली (एक धाव) यांना एकाच षटकात बाद करत चेन्नईची धावसंख्या ७२/५ अशी कमी केली. यानंतर शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी चेन्नईचा डाव सांभाळला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. जडेजाने २४ चेंडूत २० धावांची खेळी खेळली. शेवटच्या षटकात धोनी फलंदाजीला आला, पण या सामन्यात त्याला एकही षटकार मारता आला नाही. अखेरीस चेन्नईने सहा गडी गमावून १४४ धावा केल्या. शिवम दुबे ३४ चेंडूत ४८ धावा करून नाबाद राहिला. कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेनने प्रत्येकी दोन बळी घेतले. शार्दुल ठाकूर आणि वैभव अरोरा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

१४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली. रहमानउल्ला गुरबाज पहिल्याच षटकात एक धाव काढून दीपक चहरचा बळी ठरला. चहरने त्याच्या पुढच्या षटकात व्यंकटेश अय्यरलाही नऊ धावांवर बाद केले. त्याचवेळी चहरच्या तिसऱ्या षटकात १२ धावा काढून जेसन रॉयही बाद झाला. कोलकाताच्या तीन विकेट ३३ धावांत पडल्या होत्या. यानंतर नितीश राणा आणि रिंकू सिंगने डावाची धुरा सांभाळली. दोघांनी झटपट धावा केल्या आणि पॉवरप्लेमध्ये कोलकाता संघ ४६ धावा करू शकला. रिंकू सिंग आणि नितीश राणा यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. चेपॉकच्या मैदानावर चेन्नईविरुद्धची ही सर्वात मोठी भागीदारी आहे. रिंकूने ४३ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या. १८व्या षटकात मोईन अलीच्या अचूक थ्रोमुळे तो बाद झाला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नितीशच्या साथीने रिंकूने कोलकात्याची धावसंख्या १३२ धावांपर्यंत नेली होती आणि त्यांचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर उभा होता. शेवटी नितीश राणाने आंद्रे रसेलच्या साथीने कोलकाता विजय मिळवून दिला. ४४ चेंडूत ५७ धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. दीपक चहर व्यतिरिक्त एकाही गोलंदाजाला चेन्नईकडून विकेट घेता आली नाही. दीपकने पॉवरप्लेमध्येच तीन विकेट घेतल्या. यानंतर कोलकात्याची एकच विकेट धावचीत झाली.

या सामन्यात चेन्नईच्या मथिशा पाथिरानाने नितीश राणाचा झेल सोडला. यावेळी राणा १८ धावांवर खेळत होता. त्याचा हा झेल सोडणे चेन्नई संघाला महागात पडले. राणाने शानदार अर्धशतक झळकावले आणि आपल्या संघाला विजय मिळवून देऊनच परतला. त्याचवेळी नाणेफेकीच्या वेळी धोनीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, तो चुकीचा ठरला. दुसऱ्या डावात फिरकी गोलंदाजांना मदत मिळत नसल्याने फलंदाजी करणे सोपे झाले. याच कारणामुळे कोलकाता संघाला हा सामना सहज जिंकता आला. या सामन्यात कोलकाताच्या फिरकी गोलंदाजांनी चार विकेट घेतल्या, पण चेन्नईच्या फिरकी गोलंदाजांना एकही बळी घेता आला नाही.

रिंकू सिंगला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

हे पण वाचा

टीम झुंजार