मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२३ च्या ६५ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव केला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट गमावत १८६ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १९.२ षटकांत दोन गडी गमावून १८७ धावा केल्या आणि सामना जिंकला. अनुभवी फलंदाज विराट कोहली आयपीएलमध्ये सहावे शतक झळकावत आरसीबीसाठी फॉर्ममध्ये परतला. पण त्याचे ह्या सामन्यातील हे संथ शतक ठरले. त्याला फाफ डुप्लेसिसने चांगली साथ दिली आणि दोघांनी पहिल्या विकेटसाठी १७२ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या भागीदारीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आठ गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. यासह, आरसीबीच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा अजूनही जिवंत आहेत, तर हैदराबाद आधीच शर्यतीतून बाहेर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आरसीबीला शेवटचा सामना जिंकावा लागेल आणि धावगतीच्या बाबतीत मुंबईच्या पुढे राहावे लागेल. दोन्ही संघांना प्रत्येकी एक साखळी सामना खेळायचा आहे. सध्या मुंबईची धावगती -०.१२८ आहे आणि आरसीबीची धावगती +०.१८० आहे.
हेनरिक क्लासेनच्या ५१ चेंडूत १०४ धावांच्या जोरावर हैदराबादने २० षटकांत ५ बाद २८६ धावा केल्या. त्याने आठ चौकार आणि सहा षटकार मारले. बंगळुरूकडून मायकेल ब्रेसवेलने दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात कोहली आणि फॅफने लक्ष्य सोपे केले. दोघांनी संघाची निव्वळ धावगती सुधारण्यासाठी झटपट धावा केल्या आणि चार चेंडू राखून विजय मिळवला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूच्या गोलंदाजांनी २८ धावांत हैदराबादचे दोन गडी बाद केले. मात्र क्लासेनला शतक झळकावण्यापासून रोखू शकले नाहीत. क्लासेनने मार्करामसोबत तिसऱ्या विकेटसाठी ५० चेंडूत ७६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्याने हॅरी ब्रूकसोबत चौथ्या विकेटसाठी ३६ चेंडूत ७४ धावांची भागीदारी केली. हैदराबादचे आघाडीचे फलंदाज अभिषेक (११), राहुल त्रिपाठी (१५) आणि एडन मार्कराम (१८) यांनी मिळून ४६ चेंडूत ४४ धावा केल्या. सलामीवीर नसतानाही शतक झळकावणारा क्लासेन हा हैदराबादचा पहिला खेळाडू आहे. क्लासेनने आयपीएलमधील पहिले शतक ४९ चेंडूत झळकावले. त्याने १०४ धावांसाठी ५१ चेंडूंचा सामना केला. ज्यात आठ चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. त्याने १९व्या षटकात हर्षलला षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. मात्र, त्याच षटकात तो त्रिफळाचीत झाला. आयपीएलच्या या मोसमातील हे सातवे शतक आहे. बंगळुरूकडून मायकेल ब्रेसवेलने सर्वाधिक १३ धावा देत दोन बळी घेतले. हैदराबादने २० षटकांत ५ विकेट गमावत १८६ धावा केल्या.
१८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीसाठी कर्णधार प्लेसिस आणि विराट कोहली यांनी दमदार सुरुवात केली. दोघांनी मिळून पॉवरप्लेमध्ये ६४ धावा जोडल्या. यानंतरही दोन्ही खेळाडूंनी वेगाने धावा केल्या. विराटने ३५ आणि डुप्लेसिसने ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यासह आरसीबीची धावसंख्या १०० धावा पार झाली. यानंतर विराटने वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली आणि आरसीबीची धावसंख्या १५० च्या पुढे नेली. कोहलीने ६२ चेंडूत शतक पूर्ण केले, पण पुढच्याच चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याचे आयपीएलमधील हे सहावे शतक आहे. कोहलीने १९ एप्रिल २०१९ रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएलमध्ये शेवटचे शतक झळकावले होते. तेव्हाही त्याने शंभर धावाच केल्या होत्या. विराटने चार वर्षांनंतर आयपीएलमध्ये शतक ठोकले आहे. सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा माजी स्फोटक सलामीवीर ख्रिस गेलच्या बरोबरीने पोहोचला आहे. गेलनेही सहा शतके झळकावली होती. या दोघांनंतर राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरचा नंबर लागतो. बटलरने पाच शतके झळकावली आहेत. टी२० क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर विराटचे या मैदानावरील हे पहिलेच शतक आहे. यापूर्वी त्याने चार अर्धशतके झळकावली होती. कोहलीने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर १२ सामन्यात ५९२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ५९.२ इतकी होती. कोहलीची धावगती १४१.६२ आहे.
यानंतर काही वेळातच प्लेसिसही ७१ धावा करून तंबूमध्ये परतला. मात्र, तोपर्यंत आरसीबी विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. ग्लेन मॅक्सवेलने मायकेल ब्रेसवेलसोबत हातमिळवणी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
विराटच्या खेळीमुळे २०१५ नंतर आरसीबीने या मैदानावर विजय मिळवला आहे. आतापर्यंत त्यांनी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध येथे आठ सामने खेळले आहेत. त्यातला हा दुसरा विजय ठरला. २०१५ मध्ये डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे आरसीबीने सामना सहा विकेटने जिंकला होता. त्यावेळी कोहलीने १९ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या.
विराटने फॅफ डुप्लेसिससोबत पहिल्या विकेटसाठी १७२ धावांची भागीदारी केली. आयपीएलमध्ये आरसीबीसाठी पहिल्या विकेटसाठी ही दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे. पहिल्या स्थानावरही कोहलीच आहे. त्याने २०२१ मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध देवदत्त पडिक्कलसह नाबाद १८१ धावांची भागीदारी केली होती.
विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.