हैदराबाद :- पोलिसांच्या माहितीनुसार, मुसी नदीजवळ 17 मे रोजी पोलिसांना मानवी शरीरीच्या काही भागांचे तुकडे आढळून आल्याची माहिती मिळाली. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा पोलिसांना आश्चर्यकारक माहिती मिळाली.हैदराबाद: दिल्लीमध्ये झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाची (Murder Case) पुनरावृत्ती हैदराबादमध्ये झाली आहे. हैदराबादमध्ये एका व्यक्तीनं लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या आपल्या प्रेयसीची हत्या केली आहे. त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करुन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. या हत्याकांडाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्यांच्या प्रेयसीचे तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवले आणि दुर्गंधी न येण्यासाठी किटकनाशकं आणि इतर सुगंधी द्रव्ये आणि परफ्युमचा छिडकाव केला.
काय आहे प्रकरण?…
हैदराबाद पोलिसांच्या माहितीनुसार, मुसी नदीजवळ 17 मे रोजी पोलिसांना मानवी शरीरीच्या काही भागांचे तुकडे आढळून आल्याची माहिती मिळाली. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा पोलिसांना आश्चर्यकारक माहिती मिळाली. आरोपी चंद्र मोहन (वय वर्ष 48) याचे कृतिका यारम अनुराधा रेड्डी (55 वर्षीय) हिच्याशी गेल्या 15 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आपल्या पतीपासून विभक्त होऊन कृतिका चंद्र मोहन याच्यासोबत हैदराबादमधील दिलसुखनगर येथील चैतन्यपुरी कॉलनीतील त्याच्या घरामध्ये राहत होती.
कृतिका 2018 पासून पैसे व्याजावर देण्याचं काम करत होती. आरोपीनं देखील ऑनलाईन व्यापार करण्यासाठी या महिलेकडून साधारण सात लाख रुपये उधार घेतले. त्यानंतर या दोघांमध्ये पैशांमुळे वादाची ठिणगी पडली. पैशांसाठी त्या महिलेवर दबाव निर्माण करण्यासाठी तो तिला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. आरोपीनं 12 मे रोजी त्याच्या घरात त्या महिलेसोबत भांडण केलं आणि तिच्यावर चाकूनं हल्ला केला. त्यानंतर कृतिकाचा मृत्यू झाला.
शरीराचे तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवले
हत्या झाल्यानंतर आरोपीनं शरीराचे तुकडे करण्यासाठी दगड कापण्याची मशीन विकत घेतली. त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे पॉलिथिनच्या पिशवीमध्ये भरले. त्यानंतर तिचे पाय आणि हात वेगळे करुन फ्रिजमध्ये ठेवले. तिचे धड 15 मे रोजी त्याने मुसी नदीजवळ फेकून दिले. त्यानंतर आजबाजूला दुर्गंधी पसरू नये म्हणून आरोपीनं फिनेल, डेटॉल, अत्तर, अगरबत्ती आणि कापूरखरेदी करुन त्यांचा छिडकाव महिलेच्या मृतदेहाच्या तुकड्यांवर नियमितपणे करु लागला. त्यानं ऑनलाईन शरीराची विल्हेवाट कशी लावायची याचे व्हिडीओ बघितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या मोबाईलवरुन तो तिच्या ओळखीच्या लोकांना मेसेज पाठवत होता, जेणेकरुन कोणाला काही संशय येणार नाही. मुसी नदीजवळ 17 मे रोजी कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ सफाई कर्मचाऱ्यांना महिलेचं शीर आढळून आलं. कर्मचाऱ्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि तक्रार नोंदवण्यात आली.
आरोपीला अटक
सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून घेतली. त्यांनंतर आरोपीकडून गुन्हा कबूल करुन घेतला. महिलेच्या शरीराचे इतर भाग आरोपीच्या घरातून जप्त करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त, रुपेश चेन्नुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजारात ऑनलाईन ट्रेडिंग करणाऱ्या बी चंद्र मोहन याला पोलिसांनी अटक केली आहे.






