एरंडोल प्रतिनिधी
एरंडोल :- घराच्या बांधकामासाठी माहेरून वीस लाख रुपये घेवून ये तसेच घराच्या बांधकामासाठी बँकेतून चाळीस लाख रुपयांचे कर्ज काढ अशी मागणी करून मारहाण व शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार विवाहितेने पती,सासू,सासरे,दीर,चुलत सासू,चुलत सासरे यांचेविरुद्ध एरंडोल पोलीस स्थानकात दिली.याबाबत माहिती अशी,की एरंडोल येथी रहिवासी तथा नासिक येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे अधिव्याख्याता असलेल्या विशाखा हितेश निकम यांचा विवाह मालेगाव येथील उच्चशिक्षित हितेश जगन्नाथ निकम यांचेशी १९ मार्च २०१९ रोजी झाला होता.विशाखा निकम यांचे वडील संजय पाटील यांनी विवाहासाठी सुमारे पंचवीस लाख रुपये खर्च केले होते.विवाहात हितेश निकम यांना सोन्याचे दागिने देखील दिले होते.विवाहितेचा पती हितेश निकम हे न्यूझीलंडमध्ये फुजित्सू या कंपनीत नौकरीला आहेत.
विवाहानंतर पती हितेश निकम याना विशाका यांना सांगितले की माझे दुस-या मुलीवर प्रेम असून मला तीचेशी विवाह करावयाचा होता,मात्र माझ्या आई,वडिलांनी पैशांसाठी माझा तुझ्याशी माझ्या इच्छेविरुद्ध विवाह करून दिला त्यामुळे पती या नात्याने तुला माझ्यापासून कोणतेही सुख मिळणार नाही आणि मला तुझ्याबरोबर संसार करण्याची इच्छा नाही.पती हितेश निकम हे दारू पिऊन घरी यायचे आणि मला मारहाण व शिवीगाळ करून घरातील सामानाची तोडफोड करीत असत.तसेच मला त्यांच्या कामाच्या ठिकाणी न्यूझीलंड येथे नेण्यासाठी टाळाटाळ करीत होते.पती हितेश यांनी थायलंड व इंडोनेशिया येथे फिरावयास नेले आणि एके दिवशी रस्त्यावरच एकटे सोडून निघून गेले.
त्यानंतर पती हितेश निकम,सासू अनुराधा निकम,सासरे जगन्नाथ निकम,चुलत सासरे राजेंद्र निकम,चुलत सासू वर्षा निकम व दीर समीर निकम यांनी नासिक येथे घर घेण्यासाठी माहेरून वीस लाख रुपये आणावे तसेच घरासाठी बँकेकडून चाळीस लाख रुपयांचे कर्ज काढावे अशी मागणी करून मला मारहाण करून तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.तसेच एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून रात्रीच्या वेळेस नदीच्या काठावरील स्मशानभूमीत धार्मिक पुजा केली.तसेच गरोदर असतांना बळजबरी गर्भपात करून टाकला.नोव्हेंबर २० मध्ये माहेरून पैसे आणले नाही म्हणून मला घराबाहेर काढल्याची तक्रार विवाहेतेने केली आहे.याबाबत विशाखा निकम यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती, सासू, सासरे, दीर, चुलत सासरे, चुलत सासू यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील,सुनील लोहार तपास करीत आहेत.