डुंगरपूर (राजस्थान) :- जिल्ह्यातील ओबेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारबोडानिया गावात स्वत:च्या मुलीच्या लग्नाचे सात फेरे पूर्ण होताच एका बापाने जावयावर तलवारीने हल्ला केला आहे.
या हल्ल्यात जावई (वर), मुलीसह आणखी चार जण जखमी झाले. मुलीने तिच्या मर्जीने प्रेमविवाह केल्याने वडील संतापले होते. मुलगी दोन महिन्यांपूर्वी या तरुणासोबत पळून देखील गेली होती. त्यामुळे संतापलेल्या वडिलांनी लग्न होताच त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला.
डुंगरपूर जिल्ह्यातील सागवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडगडा गावातून नवरदेवाची वरात सोमवारी सकाळी बारबोडानिया गावात मुलीच्या घरी आली होती. या प्रेमी जोडप्याचे आज लग्न होते. लग्नाबाबत दोन्ही कुटुंबात उत्साहाचे वातावरण होते. वरात येताच वधूच्या कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. बँड वाजवत गात आणि नाचत वऱ्हाडी वधूच्या घरी आले होते. वधू-वरांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नाचे सर्व विधी पार पडले. लग्नाचे सात फेरे संपल्यानंतर काही वेळातच सासऱ्यांनी जावयाला खोलीत नेले आणि त्याच्यावर तलवारीने हल्ला केला.अचानक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली.
यातच नववधू पतीला वाचवण्यासाठी आली असता वडिलांनी तिच्यावरही तलवारीने वार केले. याशिवाय वराचा भाऊ अनुराग, प्रभू यादव, रोहित, पुरुषोत्तम वैष्णव हे देखील जखमी झाले. हल्ल्याच्या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. याच घटनेची माहिती मिळताच ओबेरी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना सागवाडा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, अद्याप वराच्या बाजूने कोणताही तक्रार देण्यात आलेला नाही.
दरम्यान, मुलगी दोन महिन्यांपूर्वी वरासोबत पळून गेली होती. याबाबत तिच्या वडिलांनी ओबेरी पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला होता. यानंतर दोघांचा शोध लागल्यानंतर मुलीने प्रियकरासोबत लग्न केल्याचे सांगितले. त्यानंतर वडिलांनी मुलीच्या आग्रहास्तव लग्नाला होकार दिला. पण मुलीच्या या प्रेमविवाहाने वडील खूश नव्हते.
या कारणावरून लग्न होताच त्यांनी मुलावर तलवारीने हल्ला केला.”घरच्यांनी मला जबरदस्तीने बोलवून घेतले आणि काही होणार नाही, आम्ही लग्न लावून देऊ असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही घरी आलो. लग्न लागल्यानंतर वडिलांनी पतीला आतमध्ये नेऊन जबरदस्त मारहाण केली. आम्ही आधीच कोर्टात लग्न केले होते आणि आम्ही अल्पवयीन नाही. मला माझ्या घरी जायचे नव्हते. मी माझ्या पतीच्या घरीच राहणार होते. आम्हाला गोड बोलून घरी बोलवून घेतले आणि मारहाण केली,” असा आरोप मुलीने केला आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






