गांजा लागवड प्रकरणातील फरार आरोपी मध्यप्रदेशातून ताब्यात, एरंडोल पोलीस पथकाची कामगिरी.

Spread the love

एरंडोल :- खडकेसिम (ता.एरंडोल) शिवारातील तुरीच्या शेतात गांजाची लागवड प्रकरणातील संशयीतास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे व त्यांचे सहकारी हवालदार अनिल पाटील,मिलिंद कुमावत यांनी मध्यप्रदेशातील सेंधवा येथे पाठलाग करून
ताब्यात घेतले.

याबाबत माहिती अशी,कि खडकेसिम शिवारात असलेल्या शेतात तुरीच्या पिकात गांजाची लागवड करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली
होती.४ नोव्हेंबर २२ रोजी पोलिसांनी शेतात धाड टाकून अकरा एकर शेतात शोध घेतला असता सुमारे ६१ लाख २५ हजार रुपये किमतीचा ८७५ किलो गांजा सापडला. पोलिसांनी पंचनामा करून गांजा ताब्यात घेतला मात्र गांजा लागवड प्रकरणातील आरोपी मेरसिंग खेरते हा अंधाराचा फायदा घेवून फरार झाला होता.सुमारे आठ महिन्यांपासून आरोपी मध्यप्रदेशातील वेगवेगळ्या शहरात राहून पोलिसांना गुंगारा देत होता.

एरंडोल पोलीसांचे पथक त्याच्याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत होते.पोलिसांचे पथक त्याची माहिती घेत असतांना मेरसिंग खेरते हा सेंधवा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे व त्यांचे सहकारी हवालदार अनिल पाटील,उमेश कुमावत हे सेंधवा येथे रवाना झाले.दोन दिवस पोलीस पथकाने सेंधवा येथे सापळा रचला व मेरसिंग खेरते यास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र मेरसिंग यास संशय आल्याने त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.पोलीस पथकाने त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यास ताब्यात घेवून अटक केली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे व त्यांचे सहकारी अनिल पाटील,उमेश कुमावत यांच्या पथकाने मध्यप्रदेशात जाऊन सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केल्याबद्दल
पोलिसांच्या कामगिरीचे नागरीकांकडून स्वागत करण्यात येत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे तपास करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार