धुळ्यातील मोगलाई परिसरात असलेले श्रीराम मंदिरात विटंबना, तीन संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात.

Spread the love

धुळे :- शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती संभाजीनगर अर्थात मोगलाई परिसरातील श्रीराम मंदिरात विटंबना झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी समोर आला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर मंदिराजवळ अनधिकृत उभारलेल्या शेडमध्ये रात्री अवैध व्यवसाय चालत असल्याची तक्रार आल्यानंतर दुपारी येथील अतिक्रमण काढण्यात आले.

पांझरा नदीकिनारी मोगलाईतील भोईवाडा परिसरात श्रीराम मंदिर आहे. या मंदिरात पूजा करण्याची जबाबदारी एका कुटुंबाकडे आहे. मंदिराला मंगळवारी रात्री ‘कुलूप लावण्याचे राहिले. ही संधी हेरून अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्री विटंबना केली. सकाळी भाविक पूजेसाठी आल्यावर हा प्रकार समोर आला. सकाळी मुख्यालयातून वाढीव कुमक मागवण्यात आली. मंदिराजवळ अनधिकृत पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. या ठिकाणी काही मद्यपी येऊन बसतात. याचीही चौकशी होत आहे.

गेल्या वर्षी दुसऱ्या मूर्तीचे चांदीचे डोळे गेले होते चोरीस या मंदिरात यापूर्वीही विजेचे दिवे फोडणे, अस्वच्छता करणे, मंदिराच्या बाहेर बसून मद्यपान करणे असे प्रकार घडले आहेत. गेल्या वर्षी परिसरातील अन्य एका मंदिरातील मूर्तीचे चांदीचे डोळे चोरीस गेले होते. याप्रकरणी दुपारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री योगेश मैंद, भारतीय जनता पार्टीचे रोहित चांदोडे तसेच राजेंद्र खंडेलवाल, भरत देवळे, यांच्यासह अनेकांनी पोलीस प्रशासनाशी चर्चा केली.
दरम्यान दुपारपर्यंत तीन संशयित व्यक्तींची चौकशी करण्याचे काम सुरू होते. या संदर्भात प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगितले की, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या संबंधितांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मात्र नागरिकांनी संयम राखावा. कोणत्याही अफवेला बळी पडू नये, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन यावेळेस बारकुंड यांनी केले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार