इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात होणार पहिला सामना; वेळापत्रक लवकरच जाहीर होणार
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : एकदिवसीय विश्वचषक सुरू होण्यास केवळ चार महिने उरले आहेत, परंतु अद्याप या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. २०१५ आणि २०१९ विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक स्पर्धा सुरू होण्याच्या जवळपास एक वर्ष आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र, यावेळी वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब होत आहे. आमच्या सूत्रांनुसार, बीसीसीआयने वर्ल्डकपचे वेळापत्रक ठरवून ते आयसीसीकडे पाठवले आहे. आयसीसीने हे वेळापत्रक स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्व देशांना पाठवले आहे. सर्व देशांच्या क्रिकेट बोर्डांची संमती मिळाल्यानंतर वेळापत्रक औपचारिकपणे जाहीर केले जाईल.
५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान भारतात वर्ल्ड कप होणार आहे. गतविजेता इंग्लंड सलामीच्या लढतीत न्यूझीलंडविरुद्ध खेळू शकतो. दोन्ही संघ शेवटचा अंतिम सामना २०१९ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर खेळले होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. त्याच वेळी, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना देखील याच मैदानावर १५ ऑक्टोबर रोजी होऊ शकतो. या स्पर्धेचा अंतिम सामनाही अहमदाबादमध्ये होण्याची शक्यता आहे. स्पर्धेतील इतर मोठ्या सामन्यांबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड २९ ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथे होईल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना अहमदाबादमध्ये ४ नोव्हेंबरला होणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना १ नोव्हेंबरला पुण्यात होणार आहे.
मुंबईच्या वानखेडेला उपांत्य फेरी होण्याची शक्यता आहे. सर्व संघ प्रत्येकी नऊ साखळी सामने खेळतील. यामुळे बहुतेक मैदानांना किमान एक भारतीय सामना मिळू शकेल. वर्ल्ड कपमध्ये एकूण १० संघांमध्ये ४८ सामने होणार आहेत. यजमान भारताव्यतिरिक्त इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी आपले स्थान निश्चित केले आहे.
शेवटच्या दोन संघांसाठी झिम्बाब्वेमध्ये जून-जुलैमध्ये पात्रता स्पर्धा आयोजित केली जाईल. दोन माजी चॅम्पियन वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्याशिवाय नेदरलँड, आयर्लंड, नेपाळ, ओमान, स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिराती आणि यजमान झिम्बाब्वे यात सहभागी होणार आहेत.
भारताचे संभाव्य वेळापत्रक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ८ ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान, ११ ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध पात्र संघ, २ नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध पात्र संघ, ११ नोव्हेंबर, बेंगळुरू