जळगाव : तालुक्यातील ममुराबाद येथील वीटभट्टी व्यावसायिकाने त्याच्या १० वर्षीय मुलादेखत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सकाळपासून ते सायंपर्यंत विहिरीत शोध सुरू होता आणि चिमुरडा आपले वडील कधी पाण्यातून बाहेर येतात, म्हणून विहिरीत डोकावत राहिला. अखेर सायंकाळी पित्याचा मृतदेह बघताच चिमुरड्याने धायमोकलून रडायला सुरवात केली अन् ग्रामस्थांचेही डोळे पाणावले.
समाधान भास्कर कुंभार (वय ३८, रा. पटेलवाडा, ममुराबाद) असे मृताचे नाव आहे. समाधान कुंभार यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. गुरुवारी (१५ मे) सकाळी साडेनऊला समाधान विटांचे ट्रॅक्टर खाली करण्यासाठी जळगावात १० वर्षीय मुलगा वैभव याच्यासह आले होते. तेथील काम आटोपल्यावर पिता- पुत्र गावाकडे परत निघाले. ममुराबाद येथे आल्यावर म्हाळसादेवी मंदिराजवळ समाधान कुंभार यांनी ट्रॅक्टर थांबविले. मुलाला ट्रॅक्टरवर बसवून समाधान यांनी जवळच्या विहिरीत उडी घेतली.
हा प्रकार समजल्यावर ग्रामस्थांसह तरुण मदतीला धावले. काहींनी तालुका पोलिसांना घटना कळविली. तब्बल सहा तासांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मृत समाधान कुंभार यांच्या पश्चात पत्नी ज्योती, मुलगी राणी, मुलगा वैभव असा परिवार आहे. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
तो बघत राहिला वडिलांची वाटवडिलांसोबत हिंडण्याचे कौतुक उराशी बाळगून सकाळी चिमुरडा वैभव वडील समाधान यांच्यासोबत विटाची खेप टाकण्यास जळगावला आला होता.
मात्र, समाधान यांच्या डोक्यात काय सुरू आहे. चिमुरडा वैभव याला कल्पना नसावी. गावात ट्रॅक्टर परतल्यावर पित्याने वैभवला ‘तू इथंच थांब’, असे म्हणत विहिरीच्या दिशेने धाव घेतली. वैभव टक लावून बघत असताना, अचानक वडिलांनी विहिरीत उडी घेतल्याने तोही विहिरीच्या दिशेने पळाला. त्याने हा प्रकार ग्रामस्थांना सांगितला. मदतीला गाव धावून आले. विहिरीतून मृतदेह निघेपर्यंत वैभव एकटक पित्याला बघण्यासाठी आसुसल्याचे पाहून अनेकांचा कंठ दाटून आला.
हे पण वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४