पाऊण तास मदतच मिळाली नाही!मुख्यमंत्री, उपमूख्यमंत्रीसह अनेक मंत्र्यांची घटना स्थळी भेट.
मुंबई : समृद्धी महामार्गावर ३० जूनच्या रात्री भीषण अपघात झाला. एक खासगी बस डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यामुळे बसमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली. दरम्यान दि. १ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी अपघातस्थळी जाऊन माहिती घेतली.यावेळी फडणवीसांनी या घटनेच्या कडक चौकशीचे आदेश दिले.मात्र बसचा अपघात झाल्यानंतर सुमारे अर्धा ते पाऊण तास कोणतीच मदत मिळू न शकल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
समृद्धी महामार्गावरील तुरळक वाहतूक व संसाधनांचा अभाव असल्या कारणामुळे या अपघाताची माहिती उशीरा मिळाली. त्यामुळेच मदतही उशिरा पोहोचल्याने नागपूर येथील खासगी बसच्या अपघाताची तीव्रता वाढून २५ प्रवाश्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर बसचा एक चालक कसा तरी काच फोडून बाहेर पडल्यानंतर त्यांने पोलीसांना घटनेची माहिती दिली. मात्र तोपर्यत बराच वेळ निघून गेला होता. त्यामुळे अपघाताची तीव्रता वाढून मदत घटनास्थळी पोहोचेपर्यंत मोठी जीवितहानी घडून गेली.
तसेच मध्यरात्री या मार्गावर वाहतूक अतिशय तुरळक असते, त्यामुळे अपघात घडल्यावर कोणालाच माहिती नसल्यामुळे बचाव कार्यास वेळ लागला. मात्र अपघाताची माहिती मिळताच जवळचे ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचून बचाव कार्यास लागले. मात्र ऐनवेळी घटनास्थळी मदतीस धावून जाणारे अन्य कोणीच नसल्याने या दुर्दैवी घटनेतील नुकसानीची तीव्रता वाढून गेली.
त्यानंतर काही वेळातच बस पलटी होऊन आग लागली.
या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर आठ प्रवासी थोडक्यात बचावले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र महामार्गावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी वेळीच मदत केली असती तर आणखी जीव वाचू शकले असते, असा दावा घटनास्थळी असलेल्या काही बचाव कर्मचाऱ्यांनी केला.
डोळ्यांसमोर एका मुलगा जळून मेला असे एका व्यक्तीने सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा परिसरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला. बसमध्ये एकूण 33 जण होते. या आगीत 25 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बसच्या खिडकीच्या काचा फोडून चालकासह आठ जण बाहेर आले.
प्रत्यक्षदर्शींनी दावा केला की, अपघातानंतर काही प्रवासी बसच्या मागील खिडकीच्या काचेवर आदळून मदतीसाठी आरडाओरड करत होते, पण तेथून जाणारे इतर वाहनधारक मदतीसाठी थांबले नाहीत. आगीमुळे आतून काचा फोडणे प्रवाशांना शक्य झाले नाही.
पण काहींनी असा दावाही केला आहे की, जाणारे ट्रक आणि टेम्पो चालकांनी थांबवून लोखंडी रॉडने काचा फोडण्यास मदत केली असती तर मृतांची संख्या कमी झाली असती.
अपघातानंतर बाहेर आलेल्या जखमी प्रवाशांनी मदत मागितली, पण गाड्या थांबल्या नाहीत, असा दावाही केला जात आहे. त्यातील एकाने सांगितले की, बसच्या मागे एक महिला आपल्या मुलासह काचेवर वार करून वाचवण्याची भीक मागत होती, पण आमच्या डोळ्यांसमोर त्या जळून राख झाल्या.
या भीषण अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.दरम्यान, बस अपघातातील मृत प्रवाशांची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. यासाठी डीएनए चाचणीशिवाय पर्याय नसल्याचे पोलिस यंत्रणेचे म्हणणे आहे. ही बस नागपूरहून निघताच खासगी बस बुकिंग पॉईंट कार्यालयातून मृतांची नावे घेण्यासाठी पोलिस यंत्रणा आणि प्रशासन प्रयत्नशील आहे.
“बसच्या काचा फोडून बाहेर आलेल्या ८ प्रवाशांचा प्राण वाचला”………
“या बसमध्ये एकूण ३३ लोक होते. मॅनिफेस्टमध्ये २६-२७ लोक होते. काही प्रवासी रस्त्यात येताना घेतले असतील. यापैकी बसच्या काचा फोडून बाहेर पडता आलं अशा ८ प्रवाशांचा प्राण वाचला आहे. त्यात २५ वर्षीय चालकाचाही समावेश आहे. चो दारव्याचा असून शेख दानिश शेख इस्माईल असं या चालकाचं नाव आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली.