अश्विनच्या पुढे वेस्ट इंडिजची शरणागती; दुबळ्या संघाविरुद्ध भारताचा एकतर्फी विजय

Spread the love

भारताचा आशियाबाहेर डावाच्या फरकाने सर्वात मोठा विजय

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने एक डाव आणि १४१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने जागतिक कसोटी विजेतेपद २०२३-२५ ​​मध्ये चांगली सुरुवात केली. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी इतिहासात २३ वा विजय मिळवला आहे. भारताने ऑस्ट्रेलिया (३२) आणि इंग्लंड (३१) यांच्या विरुद्ध अधिक कसोटी जिंकल्या आहेत. न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा प्रत्येकी २२ सामन्यांत पराभव केला आहे.

या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी पहिल्या डावात १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात ५ विकेट गमावत ४२९ धावा केल्या. टीम इंडियाला २७१ धावांची आघाडी मिळाली. वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या डावात १३० धावांत गारद झाला. अशा प्रकारे टीम इंडियाने सामना जिंकला. या विजयासह रोहित शर्माच्या संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा सामना २० जुलैपासून त्रिनिदाद येथे होणार आहे. आशियाबाहेर भारताचा डावाच्या फरकाने सर्वात मोठा विजय आहे.

भारताकडून या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी शतकी खेळी खेळली. विराट कोहलीने अर्धशतक ठोकले. टीम इंडियाला केवळ एका डावात फलंदाजीची संधी मिळाली. रविचंद्रन अश्विनने गोलंदाजीत टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात पाच तर दुसऱ्या डावात सात बळी घेतले. पहिल्या डावात १७१ धावा केल्याबद्दल यशस्वीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

अश्विनने या सामन्यात एकूण १२ विकेट घेतल्या. त्याने भारतासाठी आठव्यांदा एका सामन्यात १० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये अश्विनने अनिल कुंबळेची (८) बरोबरी केली. हरभजन सिंगने पाच वेळा एका सामन्यात १० किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या. याशिवाय अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध सहाव्यांदा डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटीत अशी कामगिरी करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. त्याने वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज माल्कम मार्शलला मागे टाकले. हरभजन सिंगने भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटीत पाच वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले.

दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्याच्याकडून अलिक नाथनागेने सर्वाधिक २८ धावा केल्या. जेसन होल्डरने नाबाद २० धावा केल्या. जोमेल वॅरिकन ११८, अल्झारी जोसेफने १३ आणि जोशुआ डी सिल्वाने १३ धावा केल्या. रॅमन रेफरने ११ धावा केल्या. क्रेग ब्रॅथवेट आणि तेजनारिन चंदरपॉल प्रत्येकी सात धावा करून बाद झाले. जर्मेन ब्लॅकवूडला पाच आणि रहकीम कॉर्नवॉलला केवळ चार धावा करता आल्या. केमार रोचला खातेही उघडता आले नाही. भारताकडून अश्विनशिवाय रवींद्र जडेजाने दोन बळी घेतले. मोहम्मद सिराजने एक बळी घेतला.

याआधी पहिल्या डावात भारताकडून यशस्वी जैस्वाल, कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांनी शानदार खेळी खेळली. यशस्वीने १७१ धावा केल्या. ही त्याची पदार्पणाची कसोटी होती. त्याचवेळी कर्णधार रोहितने १०४ धावांची खेळी केली. विराट कोहली ७६ धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजा नाबाद ३७ आणि इशान किशनने एक धाव काढली. शुभमन गिलने सहा आणि अजिंक्य रहाणेने तीन धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून केमार रोच, अल्झारी जोसेफ, रहकीम कॉर्नवॉल, जोमेल वॅरिकन आणि अॅलिक एथानेज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने एकतर्फी जिंकला आहे. डॉमिनिका येथे एक डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवत भारतीय संघ जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या पर्वामध्ये (२०२३-२५) विजयी सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यातील विजयासह भारताने सर्व संघांना मागे टाकत अव्वल स्थान मिळवले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या पर्वात आतापर्यंत फक्त चार संघांनी त्यांचे सामने खेळले आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामने झाले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने दोन सामने जिंकले असून इंग्लंडने एक सामना जिंकला आहे. मात्र, या दोन्ही संघांना षटकांच्या संथ गतीमुळे पेनल्टीच्या स्वरूपात प्रत्येकी दोन गुण गमावले आहेत. या संदर्भात ऑस्ट्रेलियाचे तीन सामने खेळून २२ गुण झाले आहेत. एकूण गुणांच्या हे प्रमाण ६१.११ टक्के आहे. त्याच वेळी, इंग्लंडचे १० गुण आहेत, जे एकूण गुणांच्या २७.७८ टक्के आहेत.

तर भारतीय संघाने एक सामना खेळला आहे आणि जिंकला आहे. यासह, भारताचे पूर्ण १२ गुण आहेत आणि १०० टक्के गुणांसह, टीम इंडिया गुणतक्त्यामध्ये अव्वल स्थानावर आहे. कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सहभागी असलेल्या उर्वरित पाच संघांनी आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. वेस्ट इंडिजला एकमेव सामन्यात दणदणीत पराभव पत्करावा लागला असून त्यांच्याकडे एकही गुण नाही.

कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या दोन चक्रांमध्ये टीम इंडियाला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात यश आले आहे. मात्र, दोन्ही वेळा त्यांना अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. २०२१ मध्ये न्यूझीलंड आणि २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा अंतिम फेरीत पराभव केला होता. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेच्या शेवटी, पहिले दोन स्थान असलेले संघ अंतिम सामना खेळतात. भारतीय संघ सध्या या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे आणि आपली चांगली कामगिरी सुरू ठेवून सलग तिसऱ्यांदा कसोटी स्पर्धेची अंतिम फेरी खेळू शकतो. पण २०२५ मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व रोहित शर्मा करू शकेल का हा चर्चेचा विषय ठरू शकतो.

हे पण वाचा

टीम झुंजार