मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाला दोन गडी राखून पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवासह टीम इंडिया पाच सामन्यांच्या मालिकेत ०-२ अशी पिछाडीवर आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने सात गडी गमावून १५२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने ८ गडी गमावून १८.५ षटकांत १५५ धावा केल्या आणि सामना जिंकला. भारताकडून तिलक वर्माने सर्वाधिक ५१ धावा केल्या. हार्दिकने तीन आणि चहलने दोन गडी बाद केले. निकोलस पुरनने वेस्ट इंडिजसाठी ६७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. अकील हुसेन, रोमारियो शेफर्ड आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्याने भारतीय संघासाठी प्रत्येक सामना करो किंवा मरो झाला आहे. मालिका जिंकण्यासाठी भारताला उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. त्याचबरोबर वेस्ट इंडिज आता आणखी एक सामना जिंकून मालिका जिंकू शकणार आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्या भारतीय संघाने अतिशय संथ सुरुवात केली. पहिल्या षटकात फक्त एक धाव झाली. दुसऱ्या षटकात किशनने षटकार ठोकला, पण दोन षटकांनंतर भारताची धावसंख्या नऊ झाली. तिसऱ्या षटकात गिलने षटकार मारला आणि पुढच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अल्झारी जोसेफचा बळी ठरला. गिलचा खराब फॉर्म कायम राहिला आणि तो केवळ सात धावा करू शकला. पुढच्याच षटकात सूर्यकुमार यादवला काइल मेयर्सने अचूक थ्रो करून धावबाद केले. सूर्यकुमारने केवळ एक धाव काढली. १८ धावांवर दोन विकेट पडल्याने टीम इंडिया बॅकफूटवर आली. अशा स्थितीत भारतासाठी दुसरा टी२० सामना खेळणाऱ्या तिलक वर्माने इशान किशनसह डाव सांभाळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४२ धावा जोडल्या. यानंतर किशनही २३ चेंडूत २७ धावा करून बाद झाला. रोमारियो शेफर्डने त्याला त्रिफळाचीत केले. सात धावा केल्यानंतर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात संजू सॅमसनही बाद झाला. अकिल हुसेनच्या चेंडूवर पुरनने त्याला यष्टिचित केले. भारताने ७६ धावांत चार विकेट गमावल्या होत्या.
तिलकने कर्णधार हार्दिकसह भारतीय संघाला १०० धावांच्या पुढे नेले. यादरम्यान त्याने आपल्या टी२० कारकिर्दीतील पहिले अर्धशतकही पूर्ण केले. रोहित शर्मानंतर २० वर्षीय तिलक भारतासाठी टी२० मध्ये अर्धशतक झळकावणारा दुसरा युवा खेळाडू ठरला. त्याने हार्दिकसोबत पाचव्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केली. तिलक ४१ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने ५१ धावा करून बाद झाला. अकिल हुसेनच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. अखेरच्या षटकांमध्ये हार्दिककडून तुफानी फलंदाजीची अपेक्षा होती, पण तोही १८ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने २४ धावा करून बाद झाला. अल्झारी जोसेफने अचूक यॉर्करवर त्याच्या यष्ट्या उध्वस्त केल्या. अक्षर पटेल शेफर्डचा चेंडू पूल करण्याच्या प्रयत्नात शेवटच्या षटकात बाद झाला. अक्षरने १२ चेंडूत १४ धावा केल्या. शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगने चौकार आणि रवी बिश्नोईने षटकार ठोकत भारताची धावसंख्या १५० धावांच्या पुढे नेली. अखेरीस टीम इंडियाला सात विकेट्सवर १५२ धावा करता आल्या.
१५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाची सुरुवात खूपच खराब झाली. ब्रेंडन किंग डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. हार्दिकने त्याला खातेही उघडू दिले नाही आणि तो सूर्यकुमारकडे झेल देऊन बाद झाला. पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर जॉन्सन चार्ल्सही हार्दिकचा बळी ठरला. दोन धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर तिलक वर्माने त्याचा झेल टिपला. दोन धावांवर दोन गडी गमावल्यानंतर विंडीजचा संघ संघर्ष करत होता. यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या पुरनने आक्रमक फलंदाजी करत पलटवाराला सुरुवात केली. त्याने मेयर्ससह हार्दिकच्या दुसऱ्या षटकात १७ धावा काढल्या. मात्र, मेयर्सची खेळी फार काळ टिकली नाही आणि तो सात चेंडूंत १५ धावा करून बाद झाला. अर्शदीपने त्याला पायचीत टिपले. वेस्ट इंडिजचा संघ ३२ धावांत तीन विकेट गमावून संघर्ष करत होता.
अशा स्थितीत पुरनने सतत मोठे फटके खेळून भारतीय गोलंदाजांवर दबाव आणला. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात त्याने रवी बिश्नोईवर जोरदार हल्ला केला आणि १८ धावा केल्या. पॉवरप्लेनंतर वेस्ट इंडिजची धावसंख्या ६१/३ होती. निकोलस पुरनने कर्णधार रोव्हमन पॉवेलसह चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. यादरम्यान त्याने २९ चेंडूत आपले अर्धशतकही पूर्ण केले. पॉवेल १९ चेंडूत २१ धावा करून हार्दिकचा तिसरा बळी ठरला. पॉवेल बाद झाल्यानंतर भारताच्या पुनरागमनाच्या आशा उंचावल्या होत्या, पण पुरनने आक्रमक फलंदाजी करत वेस्ट इंडिजला चार बाद १०० धावांपर्यंत नेले. ४० चेंडूत ६७ धावा करून तो बाद झाला आहे. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. मुकेश कुमारने त्याला संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. मात्र, तोपर्यंत वेस्ट इंडिज संघाने १२६ धावा केल्या होत्या आणि विजयासाठी ३० चेंडूत २७ धावांची गरज होती. वेस्ट इंडिजच्या डावातील १६व्या षटकासाठी आलेल्या चहलने सामन्याचे चित्र फिरवले. रोमारियो शेफर्ड त्याच्या षटकात धावबाद झाला. यानंतर चहलने जेसन होल्डरला इशानकरवी यष्टिचित केले आणि शेवटच्या चेंडूवर शिमरॉन हेटमायरला पायचीत टिपले. आता वेस्ट इंडिजच्या आठ विकेट पडल्या होत्या. खेळपट्टीवर दोन तळाचे फलंदाज होते आणि विजयासाठी २४ चेंडूत २३ धावा हव्या होत्या. मात्र, अकील हुसेन आणि अल्झारी जोसेफ यांनी नवव्या विकेटसाठी १७ चेंडूंत २६ धावांची नाबाद भागीदारी करत सात चेंडू राखून संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह वेस्ट इंडिज संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
निकोलस पुरनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतला तिसरा सामना ८ ऑगस्ट रोजी गयाना येथे खेळवला जाणार आहे.