झुंजार प्रतिनिधी
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : रशियावर आणखी निर्बंध लादण्याच्या भीतीने क्रूडच्या किमती प्रचंड वाढल्यामुळे बाजारपेठा खवळल्या आहेत. याशिवाय, दोन्ही राष्ट्रांमधील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. थोडक्यात, अस्थिरता कायम राहणार अाहे. जागतिक बाजारपेठांवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे. देशांतर्गत निवडणुकांचे निकाल काय लागतील, ह्यावर देखील बर्याच गोष्टी अवलंबून आहेत. ७ मार्च रोजी सेन्सेक्स १,४०० अंकांनी घसरला, निफ्टी १५,९०० च्या खाली आला; रिअल्टी, बँका ४-५% घसरल्या. सेन्सेक्स १,४०२.७४ अंकांनी किंवा २.५% घसरून ५२८४२.७५ वर आणि निफ्टी ३६६.१० अंकांनी किंवा २.२५% घसरून १५,८६३.१५ वर बंद झाला. सुमारे ८३७ शेअर्स वाढले आहेत, २५४३ शेअर्समध्ये घट झाली आहे आणि १२९ शेअर्स अपरिवर्तित आहेत. कच्च्या तेलाच्या किमती १३ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत.
हा भारतासारख्या बाजारपेठांसाठी मोठा धक्का आहे. कारण भारत आपल्या तेलाच्या गरजेच्या ८० टक्के आयातीवर अवलंबून आहे. तेलाच्या किमतींमध्ये होणारी प्रत्येक वाढ ही भारतासाठी मोठी जोखीम आहे. कारण यामुळे महागाईची चिंता वाढते, व्यापारात तूट वाढते आणि कॉर्पोरेट कमाई आणि आर्थिक वाढीवर परिणाम होतो. आंतरराष्ट्रीय ब्रेंट क्रूड फ्युचर्सने दुपारी १३९.१३ डॉलरचा इंट्राडे उच्चांक गाठला, जो २००८ नंतरचा सर्वोच्च स्तर आहे. त्याच वेळी, यूएस क्रूड १३० डॉलरच्या पातळीवर पोहोचला. अमेरिकन डॉलर भारतीय रूपयाच्या तुलनेत ७७.११ अधिक बळकट झाला.