बारबालेच्या प्रेमात तो पडला तिला इम्प्रेस करण्यासाठी केल्या 18 घरफोड्या, मित्रासोबत घेवून 50 लाखांपेक्षा ₹ जास्त उधळले बारबालावर.

Spread the love

मुंबई : प्रेम करणं यात काहीच वाईट नाही. प्रेम ही खूप सुंदर भावना आहे. पण प्रेमात आणि मोहात अडकून काय करावं? याबाबत आपण नक्कीच विचार करायला हवा. प्रेमात समर्पण असतं, त्याग असतो.
विशेष म्हणजे आदर असतो. पण या गोष्टी काही व्यक्तींसाठी अपवाद असू शकतात. त्यातलाच एक व्यक्ती म्हणजे कल्याण डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी पकडलेला युसूफ शेख. युसूफ यांची प्रेम कहाणी अतिशय विचित्र आहे. तो एका बारबालेच्या प्रेमात पडला आणि तिला इम्प्रेस करण्यासाठी नको त्या उद्योगाला लागला.

मुंबईतील डान्सबारमधील एका बारबालेवर जीव जडला म्हणून युसूफ शेख याने आपल्या गुन्हेगार मित्रासोबत तीन महिन्यात 18 घरफोडी केल्याचे उघड झालंय. त्याने आपल्या एका गुन्हेगार मित्राच्या मदतीने चोऱ्या केल्या आणि बारबालेवर सर्व पैसे उधळले. मानपाडा पोलिसांच्या तपासात याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. डोंबिवली मानपाडा पोलिसांनी सापळा रचत सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

युसूफ शेख, नौशाद आलम अशी या दोन्ही सराईत चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी या दोघांकडून 20 तोळे सोन्याचे दागिने, सव्वा 2 लाखांची रोकड, दोन बाईक, 2 लॅपटॉप, 8 मोबाईल, पाच महागडी घड्याळ, 1 महागडा कॅमेरा, स्क्रू ड्रायव्हर, चाकू, पक्कड हस्तगत केली आहेत.

पोलिसांनी ‘असा’ केला तपास…
कल्याण डोंबिवली परिसरात घरफोडीचे प्रकार वाढले होते. या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ आणि एससीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरिक्षक मदने, पोलीस अधिकारी सनिल तारमळे, अविनाश वनवे आणि प्रशांत आंधळे या तीन पोलीस अधिकाऱ्यांचं पथक नेमण्यात आलं होतं. हे पथक चोरी, लूट, स्नॅचिंग सारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी काम करत होतं.

या पथकाने डोंबिवली परिसरातील घरफोडी झालेल्या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने आणि गुप्त बतमीदाराच्या मदतीने नवी मुंबईतील घणसोली परिसरात राहणारा युसूफ शेख आणि त्याचा मित्र नौशाद या दोघांना अटक केली. पोलिसांनी या दोघांची चौकशी करत 18 गुन्हे उघड केले. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात दागिने, पैसे, लॅपटॉप, मोबाईल इतर साहित्य जप्त करण्यात आले.
आरोपीने पोलिसांना चोरीचे कारण सांगितले

विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपींना चोरी कशासाठी करायचे? हे विचारले असता त्याचं उत्तर ऐकून पोलिसही चक्रावले. यातील एक आरोपी युसूफ हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर 23 चोरीचे गुन्हे आहेत. तो आपल्या मित्रासोबत मुंबईतील एका डान्सबार गेला. तिथे त्याचा जीव डान्सबारमध्ये काम करणाऱ्या बारबालेवर जडला. तिला खूश करण्यासाठी यूसूफने आपला सराईत मित्र नौशाद आलमसोबत चोऱ्या केल्या.

50 लाखांपेक्षा जास्त पैसे बारबालावर उधळले

आरोपी बंद घरांची रेकी करायचे. ते दिवसा रेकी करायचे आणि रात्री त्या घरांची घरफोडी करायचे. त्यानंतर आरोपी चोरी केलेले पैसे बारबालेवर उधळायचा. त्याने आतापर्यंत असे 50 लाखांपेक्षा जास्त पैसे त्या बारबालेवर उधळले आहेत. सध्या पोलिसांनी या दोघांकडून 20 तोळे सोन्याचे दागिने, सव्वा दोन लाखांची रोकड, दोन बाईक, 2 लॅपटॉप, 8 मोबाईल, 5 महागडी घड्याळ, 1 महागडा कॅमेरा, स्क्रू ड्रायव्हर, चाकू, पक्कड हस्तगत करत पुढील तपास सुरू केला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार