जळगाव :- शहरातील हरीविठ्ठलनगरातील हातभट्टीची दारू तयार करणे व विक्री करण्याचा व्यवसाय करीत असलेली कुख्यात महिला डॉन दारुवाली धन्नो विरुद्ध दाखल विविध गुन्हे आणि प्रतिबंधात्मक कारवाईचाही उपयोग होत नसल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त कारवाईतून धनूबाई ऊर्फ धन्नो यशवंत नेतलेकर (वय ५०, रा.हरीविठ्ठलनगर) या महिलेवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
तसेच, देशी दारू विक्रेता विश्वास गारुंगे आणि पारोळा येथील सराईत गुन्हेगार समाधान चौधरी अशा तिघांवर एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करून कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.संपूर्ण जिल्ह्यातील अनियंत्रित सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा व पोलिस प्रशासनाने विडा उचलला आहे. रेकॉर्डवरील प्रत्येक गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावीपणे करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किशन नजन पाटील यांच्या अखत्यारीत खास पथक तयार करण्यात आले असून,
जिल्ह्यातून येणाऱ्या वेगवेगळ्या प्रस्तावातून ‘एपीडीए’च्या प्रस्तावाची निवड करून सहाय्यक फौजदार सुनील दामोदरे, ईश्वर पाटील, राजश्री पवार, इरफान मलीक अशांच्या पथकाने दस्तऐवजांची पूर्तता करवून घेत अचूक पद्धतीने ‘एमपीडीए’चा प्रस्ताव तयार करून घेत तो जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या समक्ष सादर केला. एकाच दिवसातून तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांतील गुन्हेगारांच्या स्थानबद्धतेची हॅटट्रिक जिल्हा व पोलिस दलाने केल्याने गुन्हेगारी क्षेत्रात एकच खळबड उडाली आहे.
हरीविठ्ठलनगर परिसरात धनूबाई ऊर्फ धन्नो नेतलेकर ही महिला बेकादेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री करते. रामानंदनगर पोलिसांसह गुन्हे शाखेने गेल्या काही वर्षांत तिच्याविरुद्ध असंख्य गुन्हे दाखल केले. प्रतिबंधात्मक कारवाईंतर्गत ताब्यात घेतले. हद्दपार करून पाहिले. मात्र, तिच्यात कुठलीच सुधारणा होत नसल्याने शेवटी दाखल गुन्ह्यांची संख्या पाहता ‘एमपीडीए’च्या कारवाईवर शिक्कामोर्तब झाले. धन्नोबाईला ताब्यात घेत तिला अकोला मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे.
गारुंगेविरुद्ध १८ गुन्हे
जळगाव शहरातील समतानगरातील विश्वास अरुण गारुंगे याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात एकूण १८ गुन्हे दाखल आहेत. तसेच, त्याच्याविरुद्ध चार वेळा प्रतिबंधात्मक कारवायाही करण्यात आलेल्या होत्या.
मात्र, त्याच्या वागणुकीत बदल न होता तो अधिक उग्र पद्धतीने गुन्ह्यात सहभागी असल्याचे वारंवार निष्पन्न होत आहे. विश्वास गारुंगे याच्याविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.
निरीक्षक शिल्पा पाटील, संजय सपकाळे, सुशील चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, रेवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, रवींद्र चौधरी, उमेश पवार अशांनी त्यास ताब्यात घेऊन नागपूर मध्यवर्ती कारागृहात दाखल केले.
समाधान चौधरीविरुद्ध १४ गुन्हे
पारोळा येथील राजीव गांधीनगर भागातील रहिवासी सराईत गुन्हेगार समाधान चौधरी याच्याविरुद्ध १४ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय, त्याच्याविरुद्ध एक अदखलपात्र गुन्हा दाखल असून, दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत.
पारोळा पोलिस निरीक्षक सुनील पवार, उपनिरीक्षक राजू जाधव, प्रवीण पारधी अशांनी समाधान चौधरीला ताब्यात घेत शनिवारी (ता. २) कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात दाखल केले.
हे पण वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४