फडणवीस यांनी भाजप संपवला,काही लोक गॅसच्या फुग्यासारखे तरंगायला लागली जळगाव येथील सभेत उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका.

Spread the love

जळगाव :- राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज जळगावात सरदार वल्लभभाई पटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जनसभेला संबोधित केलं.
या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. भाजपला देशात पुन्हा एकदा गोध्रा घडवून आणायचा आहे, असा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनीच महाराष्ट्रातील मूळ भाजप संपवल्याचा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीचीही खिल्ली उडवली. यावेळी सभेत फडणवीस यांचा उल्लेख टरबुज्या असा करण्यात आला.

जालनावाला कांड….. जालन्यातील आंदोलन शांततेत सुरू होतं. पोलीस अशा ठिकाणी घुसूच कसे शकतात. या आंदोलकांवर लाठीमार केला गेला. दिसेल त्याला मारलं गेलं. कुणी आदेश दिले. तो एक माणूस. जालियनवाला कांड झालं तसं जालनावाला कांड झालं. एवढी गर्दी असताना पोलीस कसे घुसवले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

टरबुज्या पाहिला नाही

तुम्ही काय म्हणाला? टरबुज्या म्हणाला. मी असा माणूस पाहिला नाही. तुम्ही जे नाव घेत आहात. तसा माणूस मी पाहिला नाही. मोठं टरबूज असतं ते. मी पाहिलं नाही. मी टरबूज बघेल. पण तो कोण आहे हे मला सांगा, अशी टीका त्यांनी केली.

फडणवीस यांनी भाजप संपवला

देवेंद्र फडणवीस यांनी भाजप संपवला. नाथाभाऊला संपवलं. सफाचट केलं. सर्व उपरे घेतले. आयाराम घेतले. भाजप कार्यकर्त्यांच्या उरावर बसवले. सर्व आयाराम आहेत. अयोध्येत राम मंदिर बनवलं जात आहे. तसंच आयाराम मंदिर बनवणार आहेत. हे आयाराम लोकं आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

पण जरांगेंना भेटायला वेळ नाही

मुख्यमंत्री दिल्लीत गेले. बायडेनशीही चर्चा करणार आहेत का? ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत फोटो काढला. कोणत्या भाषेत बोलले त्यांच्याशी? ते जे बोलले ते कळलं का? केवळ फोटो काढले. नुसती चमकोगिरी, अशी टीका करतानाच मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जायला वेळ आहे. पण मनोज जरांगे पाटील यांना भेटायला वेळ नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

वेडीवाकडी स्वप्न पडत नाहीत
संजय राऊत म्हणाले उद्धव ठकारे देशाचं नेतृत्व करतील. देशाचं नेतृत्व ही मोठी गोष्ट आहे. मला अशी वेडीवाकडी स्वप्न पडत नाहीत. माझा देशासाठी जीव जळतो, असं सांगताचना देश का नेता कैसा हो अशा घोषणा देऊ नका. देश का नागरिक कैसा हो अशा घोषणा द्या. या देशाचा नागरिक कसा असावा हे ठरवण्याची वेळ तुमच्यावर आली आहे. या देशाचा नागरिक स्वाभिमानी आणि अभिमानी होणार की भाजपचा गुलाम होणार? हे आता ठरवाच. देश का नेता म्हणू नका. देशाचा नागरिक कसा असावा तर शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखा असावा, असं ते म्हणाले.

फुग्यासारखे फुगले

काही लोक मोठी झाली. गॅसच्या फुग्यासारखे तरंगायला लागली. त्यांना वाटतं मोठे झालो असं वाटतंय. त्यांना टाचणी मारावी लागेल. ते मोठे नाहीत. तुम्हीच त्यांना मोठं केलं आहे, असं सांगतानाच आपल्या सभेला प्रचंड गर्दी आहे. निवडणूक नाही. तरीही गर्दी जमलीय. काही लोकांना गर्दी जमवावी लागते. भाड्याने लोक आणतात. भाड्याची वेळ झाली की लोक जातात. पण पुतळ्याच्या अनावरणानंतरही तुम्ही थांबलात ही मोठी गोष्ट आहे, असंही त्यांनी सांगितलं.

हे पण वाचा

टीम झुंजार