आशिया चषक !भारताच्या पाकिस्तानवर सर्वात मोठा विजय

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आशिया कपच्या सुपर-४ फेरीत भारताने पाकिस्तानचा २२८ धावांनी पराभव केला. पावसाने व्यत्यय आणलेला सामना दोन दिवसांनी संपला. रविवारी (१० सप्टेंबर) सामना सुरू झाला, मात्र पावसामुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. खेळ थांबला तोपर्यंत भारताने २४.१ षटकात १४७ धावा केल्या होत्या. सोमवार हा सामन्याचा राखीव दिवस होता. पुढे खेळताना भारतीय संघाने ५० षटकात ३५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ३२ षटकांत केवळ १२८ धावा करू शकला. नसीम शाह आणि हरिस रौफ दुखापतीमुळे फलंदाजी करू शकले नाहीत. भारतीय संघ मंगळवारी (१२ सप्टेंबर) सुपर-४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे. सुपर-४ मध्ये भारताचे खाते उघडले आहे. त्यांच्या खात्यात दोन गुण जमा झाले आहेत. पाकिस्तान आणि श्रीलंकेचेही प्रत्येकी दोन गुण आहेत.

विराट कोहली आणि केएल राहुल यांनी सोमवारी राखीव दिवशी आशिया चषकाच्या सुपर-४ सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. विराट आणि राहुलच्या फलंदाजीसमोर शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाहसारखे गोलंदाज विकेटसाठी तळमळले. याचा परिणाम असा झाला की दोन्ही फलंदाजांनी १९४ चेंडूत २३३ धावांची आशिया चषकातील सर्वात मोठी अखंड भागीदारी केली आणि भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ३५६ धावांवर नेली. भारतीय संघाची पाकिस्तानविरुद्धची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी २००५ मध्ये विशाखापट्टणममध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध नऊ गड्यांच्या मोबदल्यात ३५६ धावा केल्या होत्या.

विराटच्या ९४ चेंडूत १२२ धावांच्या नाबाद खेळीने विक्रमांची मालिका रचली. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १३ हजार धावा करणारा फलंदाज ठरला. तर राहुलने १०६ चेंडूत १११ धावा केल्या. रविवारी २४.१ षटकांत २ बाद १४७ धावा केल्यानंतर पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. इथून राखीव दिवशी भारताने डावाला सुरूवात केली. पण त्याआधी पाकिस्तानला हरिस रौफच्या स्नायूंमध्ये ताण आल्याने मोठा फटका बसला. रौफचा एमआरआय करण्यात आला. विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून पाकिस्तानने त्याला पुढे गोलंदाजी न देण्याचा निर्णय घेतला.

विराट आणि राहुल यांनी सुरुवातीला सावध खेळ केला आणि नंतर पलटवार केला. राहुलने नसीमला चौकार मारून सुरुवात केली. यानंतर त्याने इफ्तिखारला एक षटकार आणि एक चौकार मारला. त्याने आपले अर्धशतक ६० चेंडूत पूर्ण केले. यानंतर विराटनेही ५५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

अर्धशतक पूर्ण केल्यानंतर विराट बिनधास्त खेळू लागला. त्याने पुढच्या ५० धावा फक्त २९ चेंडूत केल्या. त्याची खास गोष्ट म्हणजे तो सीमारेषेवरून जास्त धावा करत होता. विकेटसमोर नसीम शाहवर मारलेला त्याचा षटकार टी-२० विश्वचषकात रौफवर मारलेल्या षटकाराची आठवण करून देनारा होता. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील ४७ वे शतक ठरले. महान सचिन तेंडुलकरच्या ४९ शतकांपासून तो फक्त दोन शतके दूर आहे. काही काळापूर्वी शतकासाठी आसुसलेल्या विराटने गेल्या वर्षभरात सात शतके झळकावली आहेत. ती कोणत्या संघाविरुद्ध झळकावली हे तितकं महत्वाचं नाही. त्याने ८४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तत्पूर्वी, राहुलने १०० चेंडूत सहावे एकदिवसीय शतक झळकावले. शस्त्रक्रियेनंतर पहिला सामना खेळणाऱ्या राहुलच्या नेत्रदीपक पुनरागमनाने भारतीय संघ व्यवस्थापनाची चिंता बऱ्याच अंशी दूर केली आहे.

४० षटकांत भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात २४७ धावा होती, मात्र शेवटच्या १० षटकांत दोन्ही फलंदाजांनी १०९ धावा जोडल्या. शाहीन आफ्रिदीने भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ३५ धावांत चार विकेट घेतल्या होत्या. सोमवारी त्याने ५ षटकात ४२ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. त्याच्या गोलंदाजीचे विश्लेषण १० षटकात ७९ धावांत १ बळी होता. नसीम शाहला शेवटचे षटक पूर्ण करता आले नाही आणि त्याला मैदान सोडावे लागले. या दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी २३३ धावांची भागीदारी करत पाकिस्तानविरुद्ध सर्वात मोठी भागीदारी केली. फहीमने टाकलेल्या डावातील शेवटच्या तीन चेंडूंमध्ये विराटने दोन चौकार आणि एक षटकार ठोकला.

पाकिस्तानचे फलंदाज कुलदीप यादवचे चेंडू समजू शकले नाहीत. कुलदीपने अप्रतिम गोलंदाजी करत आठ षटकांत २५ धावा देत पाच बळी घेतले. त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. संघाचे केवळ चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. फखर जमानने सर्वाधिक २७ धावा केल्या. इफ्तिखार अहमद आणि आगा सलमानने प्रत्येकी २३ धावा केल्या. कर्णधार बाबर आझम १० धावा करून बाद झाला. या चौघांशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी धावांपर्यंत मजल मारता आली नाही. इमाम उल हक केवळ नऊ, शादाब खान सहा, फहीम अश्रफ चार आणि मोहम्मद रिझवान केवळ दोन धावा करू शकले. शाहीन आफ्रिदी सात धावा करून नाबाद राहिला.

टीम झुंजार