ट्रॅव्हल्स बस पुलावरून कोसळली.दोन ठार, दहा जखमी. पिंपळकोठा ता.एरंडोल गावाजवळील दुर्घटना. पहा व्हिडिओ

Spread the love

एरंडोल l प्रतिनिधी :- एरंडोल कडून जळगावमार्गे छत्रपती संभाजीनगर येथे जात असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे बस कठडे तोडून पुलावरून कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात बसचे चालक व सहाय्यक चालक ठार
झाले असून बसमधील अन्य दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.जखमींमध्ये दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांचेवर जळगाव येथे शासकीय रुग्णालयात
उपचार सुरु आहेत.हा अपघात आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पिंपळकोठा गावाजवळ घडला.

याबाबत माहिती अशी की राजस्थानमधील निम का थाना येथून चौधरी ट्रॅव्हल्स कंपनीची खासगी प्रवासी बस क्रमांक ए.आर.०१ वाय ०००९ प्रवाशांना घेवून छत्रपती संभाजीनगर येथे जात होती.बसमध्ये २९ प्रवासी व दोन चालक असे ३१ प्रवासी प्रवास करीत होते.बसने राजस्थान,मध्यप्रदेश मार्गे धुळे एरंडोल,जळगाव येथून छत्रपती संभाजीनगर येथे जात असतांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील पिंपळकोठा गावाजवळ असलेल्या मित्तल कंपनी समोरील पुलावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस पुलावर असलेले संरक्षक कठडे तोडून आठ ते दहा फुट खाली कोसळली.

बस खाली कोसळताच प्रवाशांनी जोरजोरात आरोळ्या मारून मदतीसाठी आरडाओरड केली.बस पुलावरून खाली कोसळल्याचा आवाज एकूण पिंपळकोठा व पिंप्री खुर्द येथील ग्रामास्थ तसेच शेतात काम करणा-या मजुरांनी अपघातस्थळी धाव घेवून जखमींना बाहेर काढून मदतकार्य सुरु केले.अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचेसह महेंद्र पाटील, दत्ता ठाकरे,राहुल पांचपोर,राजेश पाटील,काशिनाथ पाटील यांचेसह पोलीस कर्मचा-यांनी अपघातस्थळी धाव घेवून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

जखमींपैकी चार प्रवासी गंभीर जखमी असल्यामुळे त्यांचेवर प्राथमिक उपचार करून जळगाव येथे दाखल केले.तर उर्वरित दहा किरकोळ जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कैलास पाटील,डॉ.मुकेश चौधरी,डॉ.रोहित पुराणिक यांचेसह कर्मचा-यांनी जखमींवर तत्काळ उपचार केले.शहरातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिका-यांनी देखील घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले.

जखमींपैकी मुकेशकुमार शंकरलाल गुजर यांचा मृत्यू झाला असून दुस-या मयताची ओळख उशिरापर्यंत पटली नव्हती.अपघातात रतनलाल कुमावत, दिलीपकुमार मेघवाल,दिनेशकुमार, रतिलालकुमार, जयराम गुजर,महादेव प्रसाद्कुमार,राजेंद्र प्रजापती, देवेंद्र सोनी,सितारामकुमार,मुकेश गुर्जर,बळीराम सोनी,लक्ष्मी
जांगीड (सर्व रा.राजस्थान)यांचा समावेश आहे.याबाबत रतनलाल कुमावत यांनी दिलेल्या तक्रारीवरून खासगी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
असून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार