एरंडोलला श्रीगणेशाची उत्साहात स्थापना, पंधरा ते वीस फुट मूर्तीमुळे गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण.पहा व्हिडिओ.

Spread the love

एरंडोल :- शहरात प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांसह शेकडो लहान गणेश मंडळांनी भव्य अशा गणेशमूर्तीची तसेच हजारो भाविकांनी घरगुती श्रीगणेशाची उत्साहात स्थापना केली. सकाळपासूनच भगव्या चौकातून स्थापना मिरवणुकीस सुरवात करण्यात आली होती. स्थापना मिरवणुकीच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. शहरात सुमारे अठरा सार्वजनिक तर शेकडो लहान गणेश मंडळांनी गणपतीची स्थापना केली.

यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळांच्या सुमारे पंधरा ते वीस फूट उंच आकर्षक गणेशमूर्ती गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण असून, स्थापना मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मंडळाच्या भव्य मूर्ती मिरवणूक मार्गावरून नेताना मंडळाच्या पदाधिकारी व स्वयंसेवकांना मोठी कसरत करावी लागत होती. शहरातील सकाळपासूनच प्रमुख बाजारपेठेत मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. गणेशोत्सवानिमित्त भाविकांमध्ये उत्साह दिसून आला.

जयगुरू व्यायामशाळा, संत सावतामाळी व्यायामशाळा, बालवीर मित्रमंडळ, बालमित्र गणेश मंडळ, पांडववाडा मित्रमंडळ, नागराज मित्रमंडळ, छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ, हरीपुरी युवक मंडळ, नागराज मित्र मंडळ, सर्वोदय मित्र मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, भगवा चौक गणेश मंडळ, बालाजी मित्रमंडळ, माहेश्वरी नवयुवक गणेश मंडळ, अखिल ब्राम्हवृंद युवक मंडळ, नम्रता गणेश मंडळ, जय बजरंग गणेश मंडळ, ज्ञानदीप मित्र मंडळ, श्री संताजी गणेश मंडळ या प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांनी शिस्तबद्ध लेझीम खेळत मिरवणूक काढूनगणेश मूर्तीची स्थापना केली.

शहराबाहेर असलेल्या सर्व नवीन वसाहतींमध्ये शेकडो लहान मंडळांनी गणेशाची उत्साहात स्थापना केली. गणेशोत्सवानिमित्त विविध प्रकारची लाईटिंग, सजावटीचे साहित्याची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. पालिकेतर्फे प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद बागल, पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांनी बंदोबस्त चोख ठेवला होता. स्थापना मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी मंडळाचे प्रमुख पदाधिकारी प्रयत्न करीत होते.

पहा मिरवणूक व्हिडिओ

टीम झुंजार