गणेश मंडळाच्या पदाधिका-यांवरील गुन्हे मागे घ्या.आ. चिमणराव पाटील यांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी. मुख्यमंत्र्याची पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा.

Spread the love

एरंडोल :- शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिका-यांवर पोलीस प्रशासनाने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून केली आहे.आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विसर्जन मिरवणुकीबाबतची सर्व
माहिती दिली,पदाधिका-यांवर गुन्हे दाखल करून प्रशासनाने त्यांच्यावर अन्याय केला असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या निदर्शनास आणून दिले.

शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रीगणेशाच्या विसर्जन मिरवणुकीस केवळ उशीर झाला या कारणास्तव सतरा सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिका-यांवर पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत.विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली असतांना पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले.गणेश मंडळाच्या पदाधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे शांतता समितीचे सर्व सदस्यांनी राजीनामे देवून प्रशासनाचा निषेध करणार असल्याचेही आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.

एरंडोलमध्ये सर्व सामाजिक व धार्मिक उत्सव शांततेत साजरे केले जातात.सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत पार पडल्यानंतरदेखील पदाधिका-यांवर गुन्हे दाखल करून पोलीस प्रशासन हुकुमशाही पद्धतीने वागत असल्याचे
सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांचेशी संपर्क साधून झालेल्या प्रकाराबाबतची माहिती जाणून घेतली.मंडळाच्या पदाधिका-यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत
सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार चिमणराव पाटील यांना दिले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे गणेश मंडळाच्या पदाधिका-यांसह नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार