मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाचा दुसरा सामना अफगाणिस्तानशी होता. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ३५ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. विश्वचषक २०२३ मध्ये भारताची विजयी मोहीम सुरूच आहे. आपल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा आठ विकेट्सने पराभव केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ गडी गमावून २७२ धावा केल्या. कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने ८० धावांची तर अजमतुल्ला उमरझाईने ६२ धावांची खेळी खेळली.
प्रत्युत्तरात भारताने ३५ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. कर्णधार रोहित शर्माने ८४ चेंडूत १६ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने १३१ धावांची खेळी केली. तर विराट कोहली ५६ चेंडूत ५५ धावा करून नाबाद राहिला. त्याने ३५व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. विराटचे एकदिवसीय कारकिर्दीतील हे ६८वे अर्धशतक होते. त्याचवेळी त्याचे हे विश्वचषकातले सलग दुसरे अर्धशतक ठरले. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ८५ धावा केल्या होत्या. भारताचा पुढचा सामना आता १४ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये पाकिस्तानशी होणार आहे.
हा सामना सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माला सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी तीन षटकारांची गरज होती. ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५५३ षटकार मारले होते. त्याने ४८३ आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ५५१ डावांमध्ये ही कामगिरी केली. त्याचवेळी रोहितने केवळ ४५३ आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ४७३व्या डावात हा विक्रम केला. ख्रिस गेलच्या आत्मचरित्राचे नाव ‘सिक्स मशीन’ असे आहे, पण आता रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नवे सिक्स मशीन बनले आहे.
रोहितने ६३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तो एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वात जलद शतक करणारा खेळाडू ठरला. या बाबतीत रोहितने महान कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडला. कपिल देव यांनी १९८३ च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध अवघ्या ७२ चेंडूत शतक झळकावले होते.
रोहितने विश्वचषकामध्ये सात शतके झळकावली आहेत. या बाबतीत रोहितने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावताच रोहितने सचिनला मागे सोडले आणि एकदिवसीय विश्वचषकात सात शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला.
अफगाणिस्तानविरुद्धच्या शतकासह रोहितने एकदिवसीय सामन्यांमध्ये ३१ शतके पूर्ण केली आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगनेही आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत केवळ ३० शतके झळकावली होती. हिटमॅनने अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावताच त्याने पाँटिंगला मागे टाकले आणि एकदिवसीय इतिहासात सर्वाधिक शतके करणारा तिसरा फलंदाज बनला.
रोहितच्या नावावर आजवर खेळलेल्या १९ एकदिवसीय विश्वचषक सामन्यात २८ षटकार आहेत. अफगाणिस्तानविरुद्ध पाच षटकारांसह हिटमॅन विश्वचषकामध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय ठरला. या प्रकरणात रोहितने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने एकदिवसीय विश्वचषकामध्ये २७ षटकार मारले होते.
या सामन्यात २२ धावा केल्यानंतर रोहितने एकदिवसीय विश्वचषकातही हजार धावा पूर्ण केल्या. त्याने विश्वचषकातील १९ डावांमध्ये हजार धावा पूर्ण केल्या. यासह त्याने या स्पर्धेत सर्वात कमी डावात हजार धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नरची बरोबरी केली. वॉर्नरने याच विश्वचषकात भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानेही हा टप्पा १९ डावांत गाठला होता.
एकदिवसीय क्रिकेटमधील सलामीवीर म्हणून रोहितचे हे २९वे शतक होते. या बाबतीत तो सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत सनथ जयसूर्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. सलामीवीर म्हणून त्याने २८ शतके झळकावली होती. त्याचवेळी, हे एकूण विश्वचषकातील सहावे जलद शतक ठरले. विश्वचषकातील सर्वात जलद शतकाचा विक्रम या आवृत्तीत एडन मार्करामच्या नावावर होता. त्याने ४९ चेंडूत शतक झळकावले. एकदिवसीय क्रिकेटमधील भारताचे हे पाचवे सर्वात जलद शतक ठरले. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावले आहे. २०१३ मध्ये नागपुरात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ५२ चेंडूत शतक झळकावले होते.
रोहितची सात विश्वचषक शतके सहा वेगवेगळ्या संघांविरुद्ध आहेत. सचिन तेंडुलकर (६ शतके) आणि कुमार संगकारा (५ शतके) यांनी स्पर्धेत पाच वेगवेगळ्या संघांविरुद्ध शतके झळकावली.
एकदिवसीय विश्वचषकात भारताने विक्रमी सातव्यांदा २५० हून अधिक धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठले. इतर संघांवर नजर टाकल्यास, पाचपेक्षा जास्त वेळा २५० पेक्षा जास्त लक्ष्य कोणीही गाठले नाही. त्याचवेळी, भारताने विश्वचषकात यशस्वीपणे गाठलेल्या लक्ष्यात रोहितचे हे तिसरे शतक ठरले. या प्रकरणात त्याने वेस्ट इंडिजचे माजी महान खेळाडू गॉर्डन ग्रीनिज, पाकिस्तानचे रमीझ राजा आणि न्यूझीलंडचे स्टीफन फ्लेमिंग यांना मागे टाकले.
हे पण वाचा
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४