एमआयडीसी पोलीसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश, नऊ दुचाकी हस्तगत; अल्पवयीनसह तिघांना घेतले ताब्यात.

Spread the love


जळगाव :- सह छत्रपती संभाजी नगर, नाशिक, बीड जिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश एमआयडीसी पोलीसांनी केला आहे. या कारवाईत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून इतर तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आले आहे. पोलीसांनी चोरीच्या नऊ दुचाकी हस्तगत करण्यात यश आले आहे.

एमआयडीसीतील राम दालमिल कंपनीच्या गेटसमोरून भुषण दिलीप पाटील रा. जुने जळगाव यांची २९ जुलै रोजी दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीवाय ८४९०) चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्याचा शोध सुरू असतांना मेहरूण परिसरातील काही तरूण बाहेरगावाहून महागड्या दुचाकी चोरून आणून विक्री करण्याच्या तयारीत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली.

त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. गुन्हे शोध पथकाने मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता कारवाई करत संशयित आरोपी दानीश शेख कलीम वय-२० रा. पिरजादेवाडा मेहरूण, सोमनाथ जगदीश खत्री वय-२१ रा. जोशीवाडा मेहरूण, आवेश बाबुलाल पिंजारी वय-२० रा. मेहरूण आणि एक अल्पवयीन मुलगा यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता चोरीच्या नऊ दुचाकी काढून दिल्या. या दुचाकी त्यांनी जळगाव, छत्रपती संभाजी नगर, नाशिक आणि बीड जिल्ह्यातून चोरी केल्याची कबुली दिली आहे.

यांनी केली कारवाई

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, योगेश बारी, किशोर पाटील, सचिन पाटील, पोकॉ छगन तायडे, किरण पाटील, ललीत नारखेडे यांनी ही कारवाई केली.

हे पण वाचा

टीम झुंजार