भुसावळात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा मध्यरात्री खून.जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच.

Spread the love

भुसावळ :– एकीकडे सर्वत्र दसर्‍याचा उत्साह सुरू असतांना मध्यरात्रीनंतर शहरात पुन्हा एकाचा खून झाल्यामुळे परिसर हादरला आहे.
भुसावळ शहरासह परिसरातील गुन्हेगारी हा चिंतेचा विषय झालेला आहे. पोलीस प्रशासनाने अनेक गुन्हेगारांना हद्दपार केले असले तरी देखील गुन्हेगारी कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. यातच अलीकडच्या काळात खुनांची सुरू असलेली मालिका देखील कायम असल्याचे अधोरेखीत झाले आहे. या पार्श्‍वभूमिवर, विजयादशमी अर्थात दसर्‍याच्या रात्री शहर पुन्हा एकदा खुनाने हादरले आहे.

काल मध्यरात्रीनंतर पाऊण वाजेच्या सुमारास शहरातील गरूड प्लॉट परिसरात दोस्ती मंडळाच्या जवळ दिलीप जोनवाल यांच्यावर अज्ञात मारेकर्‍यांनी प्राणघातक हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. काल नवरात्रीचा शेवटचा दिवस असल्याने पोलीस प्रशासनावर आधीच ताण होता. यात या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

गेल्या महिन्यात भुसावळात चार खून झाले होते. यात गुन्हेगार निखील राजपूत याच्यासह कंडारी येथील दोघांचा समावेश होता. यानंतर खडका रोड परिसरात एकाचा खून झाला होता. या पाठोपाठ आता शहरातील मध्यवर्ती परिसरात दिलीप जोनवाल ( वय ४९, रा. महात्मा फुले नगर, भुसावळ ) यांचा खून झाल्यामुळे परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, रात्री उशीरापर्यंत या संदर्भात शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या कृत्याला पूर्व वैमनस्याची जोड असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे फिरवली आहेत. तर मयत दिलीप जोनवाल हे माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार