व्यापारी संकुलातील गाळा विकत घेण्यासाठी मुद्रा योजनेतून कर्ज मिळवून देण्याचे आमिश; व्यापाऱ्याची ६ लाख ५० हजार रुपयात फसवणूक

Spread the love

डहाणू :- शहरातील व्यापाऱ्याला गाळा विकत घेण्यासाठी मुद्रा योजनेतून कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून साडेसहा लाखांचा गंडा घालणाऱ्या संशयित आरोपीला जळगाव जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.त्याला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. डहाणूतील एका व्यापाऱ्याला गाळा विकत घेण्यासाठी पैशांची आवश्‍यकता होती. त्यासाठी त्याला अरविंद बाविस्कर याने २७ लाख ५० हजार रुपयांचे मुद्रा योजनेतून कर्ज काढून देण्याचे आश्‍वासन दिले.

व्यापाऱ्याकडून त्याने टप्प्याटप्प्याने सहा लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र त्याला कर्ज न मिळाल्याने दुकानदाराने त्याच्याकडे विचारणा केली. या वेळी तो वेगवेगळी कारणे देत राहिला. त्यामुळे व्यापारी दुकानदाराने आपली फसवणूक झाल्याचे समजताच २५ ऑगस्ट २०२३ रोजी अरविंद बाविस्कर याच्याविरोधात डहाणू पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक भरत डांगे, उपनिरीक्षक नारायण पाटील यांनी तपास सुरू केला, मात्र आरोपी सतत गुंगारा देत राहिला. अखेर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे धागेदोरे जुळवून, अरविंद बाविस्कर याला १९ ऑक्टोबर २०२३ रोजी जळगाव जिल्ह्यातील एका गावात अटक केली.

हे पण वाचा

टीम झुंजार