हिंगोली : मराठा आरक्षणासाठी राज्यात एकीकडे मराठा तरुणांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू असतानाच आता त्या मराठवाड्यात पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येने डोकं वर काढलं आहे. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्या आत्महत्या करणाऱ्या चिमुकलीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत तिच्या भावना मांडल्या आहेत.त्या चिमुकलीचे ते पत्र सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. दुष्काळी विभाग म्हणून विदर्भ-मराठवाड्याची ओळख आहे.
याच मराठवाड्यात यंदा पावसाने अवकृपा दाखवल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. हाती आलेलं पिकातून लागवडीचा खर्चही निघाला नसल्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आता आत्महत्येचा पर्याय निवडला आहे. अशातच हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके येथील शेतकरी नारायण खोडके यांनी पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने तसेच अवेळी पाऊस आणि त्यातच कर्जाचा डोंगर. या सगळ्याला कंटाळून आत्महत्या करत आयुष्य संपवलं. मात्र, आत्महत्या केल्याने त्यांच्या परिवारावर आणखीनच दुःखाचा डोंगर उभा ठाकला आहे. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातून आठव्या वर्गात शिकत असलेल्या मुलीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून परिस्थिती सांगितली आहे. किरण खोडके असे त्या चिमुकलीचे नाव आहे.

डोळ्यांच्या कडा ओल्या होणारं…. हेच ते पत्र किरण खोडके या चिमुकलीने आपल्या पत्रात मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटलं आहे की, तुमचा दसरा चांगला गेला असेल आणि दिवाळी देखील चांगली जाईल. पण आमच्या घरी दसरा ही नाही अन् दिवाळीही नाही. आई सतत रडत असते. सोयाबीनला भाव असता, तर तुझा बाबा वारला नसता, असं आई सांगतेय. घरातून गेलेला बाबा पुन्हा आलाच नाही. आजीला विचारलं तर ती म्हणते बाबा देवा घरी गेलाय. सर देवाचं घर कुठे आहे त्याचा नंबर द्या आणि माझ्या बाबाला लवकर लवकर पाठवा. लवकरच दिवाळी आहे आणि मी आणि माझा दादू वडिलांची रोज वाट पाहतोय पण ते येत नाहीत. आता आम्हाला रिसोडच्या बाजारात कोण कपडे घेऊन देणार, असा सवाल देखील या पत्रामधून या चिमुकलीनं केला आहे.

तुमची दीदी खूप रडतेय…. लोक सांगतात सरकारमुळे तुझा बाबा देवा घरी गेलाय हे खरं आहे का? देवाला सांगून माझ्या बाबाला परत आमच्याकडे पाठवा. बाबाला म्हणा तुमची दीदी खूप रडतेय. मग ते लवकर येतात, असं वेदनादायी पत्र या चिमुरडीने मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






