मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लोकसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तशा उमेदवारीसाठी इच्छुक आणि संभाव्य उमेदवारांच्या हालचाली वाढू लागल्या आहेत. या दृष्टीने इच्छुक उमेदवार उमेदवारीसाठी अपेक्षित पक्षाच्या पक्ष नेतृत्वाला भेटत असून, उमेदवारीसाठी ‘फिल्डिंग’ लावत आहेत. अशात शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी एकीकडे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून अंतिम मानले जात असताना माजी आ. सीताराम घनदाट यांनी आपले पुत्र आणि अभ्युदय बँकेचे अध्यक्ष संदीप घनदाट यांच्यासह शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने शिर्डीच्या ठाकरे गटाच्या उमेदवारीवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
प्रसार माध्यमातून घनदाट परिवाराची उद्धव ठाकरें सोबत झालेल्या भेटीबाबत वृत्त प्रसिद्ध झाले असून, त्यात ठाकरे यांनी शिर्डी लोकसभेसाठी अभ्युदय बँकेचे अध्यक्ष संदीप घनदाट यांच्या उमेदवारीवर चर्चा झाली असून घनदाट परिवाराला कामाला लागण्याचे सांगितले असल्याचा दावा केला गेला आहे. संदीप घनदाट हे माजी आमदार सीताराम घनदाट यांचे चिरंजीव आहेत. या वृत्तामुळे शिर्डी लोकसभेसाठी भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या दाव्यानंतर आता या स्पर्धेत तिसरे नाव घनदाट यांचे आल्याने ठाकरे शिवसेनेची उमेदवारी नेमकी कुणाला यावर नगर जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.
मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत माजी आमदार सीताराममामा घनदाट व त्यांचे चिरंजीव संदीपदादा घनदाट यांनी सुमारे एक तास चर्चा केली. त्यात घनदाट यांचा राजकीय आवाका ठाकरे यांनी जाणून घेतला. घनदाट यांच्या राज्यातील ताकदीचा पक्षाला कसा फायदा होईल, याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी ठाकरे यांना दिली. खासदार राजन विचारे, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, नागेश बालकालशे, गणेश चौधरी, मनीष कांबळे, नगरचे संजय खामकर यांनी या चर्चेत सहभाग घेतला. पक्षाच्या खासदारांनीही ग्रीन सिग्रल दिला. त्यामुळे चर्चा झाल्यानंतर ठाकरे यांनी घनदाट मामा यांना कामाला लागा, असे स्पष्ट निर्देश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. घनदाट यांच्या उमेदवारीसाठी नगर जिल्ह्यातीलच काही स्थानिक पुढाऱ्यांनीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गळ घातली होती. तसेच आता पक्षाच्या खासदारांनीच ग्रीन सिग्रल दिल्याने घनदाट यांच्या उमेदवारीची लवकरच अधिकृत घोषणा होईल, असेही घनदाट मामा यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले, मी नगर जिल्ह्यातील आणि शिर्डी मतदारसंघातील भूमिपुत्र आहे. जिल्ह्यात अनेक वर्षे जिल्हा परिषदेत गट विकास अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी तसेच शिर्डी साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर शिवसेनेकडून पाच वर्षे शिर्डीचे खासदार म्हणून जनतेचे प्रतिनिधित्व केले आहे. मधल्या काळात काही चुका झाल्या. मात्र खुद्द उद्धव साहेबांनी मला मुंबईत बोलावून पुन्हा पक्ष प्रवेश दिलेला असल्याने शिर्डी लोकसभेच्या संभाव्य उमेदवारीबाबत आपल्याला कसलीही शंका नाही. राज्यात महाविकास आघाडी असून, आघाडीचा धर्म म्हणून योग्य वेळी उमेदवारीचा निर्णय घोषित होईल. त्या दृष्टीने आपण कामाला लागलो आहोत. रोज विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने नागरिकांच्या गाठीभेटी सुरू झाल्या असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले आहे. तसेच मविआतील काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही भेटी झाल्या असून, माझ्याबाबत ही नेते मंडळी अगदी सकारात्मक असल्याचा दावाही वाकचौरे यांनी केला आहे. आपण मुंबईत मातोश्रीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती वाकचौरे यांनी दिली आहे.
दरम्यान, शिंदेसेना व भाजप अजून उमेदवारीबाबत गोंधळलेल्या स्थितीतच आहेत. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनीही भाजप- शिवसेनेकडे येथून उमेदवारी मागितलेली आहे. तथापि, त्यावर अजून विखे-पाटील यांनीच ग्रीन सिग्रल दिलेला नाही. खासदार सदाशिव लोखंडे पुन्हा लढण्यासाठी कंबर कसून आहेत. तथापि, त्यांची अलिकडच्या काळातील विखे पाटील यांच्या विरोधातील भूमिका अडचणीची ठरेल, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे. शिर्डीत नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा झाला होता. त्यात खा. लोखंडे यांना फारसे महत्त्व दिले नसल्याची कुजबूज आहे. मित्रपक्षाचे खासदार असूनही त्यांच्याकडे झालेल्या दुर्लक्षाची वेगळीच चर्चा रंगली. म्हणजे खा. लोखंडे यांना आता विखे पाटील यांची नाराची भोवणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, घनदाट परिवार मूळचा नगर जिल्ह्यातीलच नांदूर पठार (ता. पारनेर) येथील रहिवासी आहे. तथापि, व्यवसायाच्या निमित्ताने ते जिल्ह्याबाहेर आहेत. त्यामुळे ‘उबाठा’ने घनदाट मामा यांना उमेदवारी दिल्यास बाहेरचा उमेदवार लादला, असे म्हणण्याची संधी विरोधकांना मिळणार नसल्याचा दावा घनदाट मामा यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. माजी आमदार सीताराम घनदाट मामा यांनी सप्टेंबर २०२०मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे ते माजी आमदार आहेत. तसेच अभ्युदय बँकेचे संचालक व सहकार क्षेत्रातील एक मोठे नाव असलेल्या घनदाट मामांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला बळ मिळाल्याचे मानले जात असताना आता त्यांचे चिरंजीव संदीपदादा यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवाराचेही त्यावर एकमत झाले असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.