कैद्याला भेटण्यासाठी दोन हजार रु लाच मागणाऱ्या कारागृहातील सुभेदारासह दोघा महिलांना लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले.

Spread the love

जळगाव जिल्हा कारागृहातील घटना. लाचखोरीचे माहेरघर बनले कारागृह.

जळगाव :- कारागृहातील न्यायबंदिला भेटण्यासाठी दोन हजारांची लाख स्वीकारताना सुभेदारासह दोघा महिला पोलिसांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहात पकडले.भीमा उखर्डु भिल यांच्यासह महिला पोलिस पूजा सोपान सोनवणे, हेमलता गैबू पाटील यांचा अटक केलेल्या तिघांमध्ये समावेश आहे.पहूर येथील रहिवासी तक्रारदार महिलेचा मुलगा एका गुन्ह्यात जिल्हा कारागृहात बंदिवासात आहे.

मुलाला भेटण्यासाठी तक्रारदार महिलेकडून प्रत्येक वेळी पैशांची मागणी करण्यात येत होती. शंभर- दोनशे रुपये देण्यास या महिलेची हरकतही नव्हती. मात्र, एका भेटीसाठी चक्क दोन हजारांची मागणी होत असल्याने ही महिला अडचणीत सापडली होती. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने नेमके काय करावे म्हणून विवंचनेत असताना जेलगेटवर पैशांची होणारी अडवणूक पाहता या महिलेने थेट धुळे लाचलुचपत विभागाचे कार्यालय गाठले.

या पथकाची कारवाई….. पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांना घडला प्रकार कथन केल्यावर तक्रारीची खात्री करून अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनातील पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, रामदास बारेला, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागूल, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे अशांच्या पथकाने धुळ्याहून सकाळीच जळगाव गाठले. जेल गेटवर साध्यावेशात सापळा रचण्यात आला होता.

इशारा होताच हाती बेड्या….

तक्रारदार महिला कारागृहाच्या गेटवर येताच आदल्या दिवशी ठरल्या प्रमाणे, गेटवर हजर कारागृह महिला सुरक्षारक्षक पोलिस पूजा सोनवणे, हेमलता पाटील आणि सुभेदार भीमा उखर्डू बिल अशांनी महिलेस ठरल्याप्रमाणे आजही २ हजारांची मागणी केली. रक्कम काढून हातात देताच सावध असलेल्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने झडप घातली. ‘एसीबी’ ऐकताच जेल गेटवर एकच खळबळ उडाली. तिघांना पचांसमक्ष ताब्यात घेत वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन जिल्‍हापेठ पोलिसांत आणण्यात आले. जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात तिघांच्या विरुद्ध लाचलुचपत अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

लाचखोरीचे माहेरघर… जिल्‍हा कारागृहापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर एका बाजूने जिल्‍हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्‍हाधिकारी बसतात तर, त्याच आवारात जळगाव लाचलुचपत विभागाचे कार्यालय देखील आहे. असे असताना कारागृहाच्या गेटवर सर्रास लाच उकळली जाते.कैदी आजारी पडला तर, त्याला रुग्णालयात पाठवण्यासाठी वेगळे रेट, कैद्याचा घरून डबा आला त्यासाठी वेगळं, नुसती कैद्याची भेट घ्यायची असेल तर त्यासाठी वेगळं रेट ठरवण्यात आले असून हा सर्व खेळ सिसीटीव्हीने सज्ज असलेल्या आवारात राजरोसपणे सुरु असतो.

हे पण वाचा

टीम झुंजार