मुंबई :- मुंबईतील विक्रोळी न्यायालयात दाखल असलेल्या कौटुंबिक हिंसाचार खटल्यात आईचा सांभाळ न करणारी दोन मुले व त्यांच्या पत्नी यांच्यावर अटक वॉरंट बजावण्यात आले होते. तेव्हापासून हे सर्व फरारी झाले होते. लोणंद पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर दोन मुलांसह त्यांच्या पत्नींना अटक करुन त्यांची रवानगी विक्रोळी न्यायालयासमोर करण्यात आली आहे. लोणंद पोलिसांनी दि. 8 रोजी ही कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खंडाळा तालुक्यातील पिंपरे बुद्रूक येथील श्रीमती ताराबाई ज्ञानदेव शिंदे (वय 75) या ज्येष्ठ महिला विधवा असून त्यांची मुले त्यांचा सांभाळ करत नसल्याने त्या मुंबईला मुलीकडे राहत आहेत. त्यांच्यावर मुलांनी व सुनांनी कौटुंबिक हिंसाचार केल्याने प्रताप ज्ञानदेव शिंदे, विजय ज्ञानदेव शिंदे तसेच सुना सौ. निर्मला प्रताप शिंदे, सौ. सुषमा विजय शिंदे (सर्व रा. पिंपरे बुद्रुक) या चौघांवर विक्रोळी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

या खटल्यात न्यायालयाने जप्ती वॉरंट, अटक वॉरंट व प्रोक्लेमेशन ऑर्डर काढल्याने मुले व सुना फरारी झाले होते. दि. 8 रोजी हे सर्व जण त्यांच्या पिंपरे बुद्रुक येथील घरी आल्याची माहिती लोणंदचे प्रभारी अधिकारी सुशील भोसले यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथक पाठवून दोन मुले व त्यांच्या पत्नींना अटक केली. त्यांना पोलीस बंदोबस्तात विक्रोळी न्यायालयासमोर हजर करण्यात आले करुन प्रोक्लेमेशन वॉरंटची बजावणी केली आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेखर, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल व फलटणचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, सहायक पोलीस निरीक्षक रमेश वळवी, हवालदार धनाजी केशव भिसे, योगेश कुंभार, नितीन भोसले, विठ्ठल काळे, अश्विनी माने, संजय चव्हाण यांनी सहभाग घेतला होता.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






