दिवाळी निमित्ताने घराची साफसफाई करतांना तिसऱ्या मजल्यावरून पडून कृषी पर्यवेक्षकाचा मृत्यू

Spread the love

जळगाव :- शहरातील मोहाडी रोडवरील नित्यानंद सोसायटी परिसरातील ५० वर्षीय रहिवासी गृहस्थ इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. ९) घडली. रामानंदनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उल्हासराव चंद्रराव पाटील (वय ५२, रा. नित्यानंद सोसायटी, मोहाडी रोड, जळगाव) असे मृताचे नाव आहे.उल्हासराव पाटील मोहाडी रोडवरील नित्यानंद सोसायटीत पत्नी व दोन मुलांसह तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वास्तव्याला होते.

ते ममुराबाद येथील जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी विभागात कृषी पर्यवेक्षक पदावर होते. दिवाळी असल्याने गुरुवारी सकाळी ते घराच्या बाल्कनीत साफसफाईचे काम करीत होते. साफसफाई करताना पाय घसरून तोल गेल्याने ते तिसऱ्या मजल्यावरून पडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी-सकाळी अचानक ही घटना घडल्यावर परिसरातील रहिवाशांनी एकच गर्दी केली होती. अपघाताची माहिती कळताच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाइकांसह परिचितांनी धाव घेतली.

या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलिस नाईक सुनील पाटील तपास करीत आहेत. त्यांच्या मागे पत्नी सुवर्णा, मुलगा हितेश आणि मुलगी हर्षदा असा परिवार आहे. हर्षदा ही ‘बीडीएस’चे शिक्षण घेत असून, हितेश हा ‘बीएएमएस’चे शिक्षण घेत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार