फॉर्च्युनर कारमधून आलेले 6 जण घरात घुसले अन् 10 वर्षांच्या मुलाचं अपहरण करून घेवून गेले.आरोपीमध्ये बापाला पाहून पोरगं हादरलं.

Spread the love

लुधियाना :- पंजाब राज्यातल्या लुधियाना जिल्ह्यातल्या अकालगढ नावाच्या गावात वडिलांनीच आपल्या 10 वर्षांच्या मुलाचं अपहरण केल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. फॉर्च्युनर कारमधून आलेल्या 6 बुरखेधारी व्यक्तींनी पिस्तुलाच्या धाकाने मुलाचं अपहरण केलं. या अपहरणकर्त्यांमध्ये मुलाच्या वडिलांचाही समावेश होता, असं समजतं आहे.बीनस सिंग असं अपहरण झालेल्या 10 वर्षांच्या मुलाचं नाव असून, बुटासिंग पासला असं आरोपी वडिलांचं नाव आहे. या अपहरणाला कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी आहे. आई-वडिलांमध्ये वाद असल्याने बीनससिंग गेल्या दोन-अडीच वर्षांपासून आपल्या आईच्या आई-वडिलांकडे म्हणजेच आजी-आजोबांकडे, अकालगढमध्ये राहत होता.

बीनससिंगची आई कुलदीपकौर पासला युनायटेड किंग्डममध्ये राहते. तिने आपल्या मुलाच्या पालनपोषणाची, शिक्षणाची पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी आपल्या आई-वडिलांकडे दिली आहे. बुटासिंग बीनससिंगचं अपहरण करण्याची शक्यता असल्याचा अंदाज कुलदीपकौर आणि तिच्या आई-वडिलांना आधीपासूनच होता. त्यामुळे त्यांनी पोलिसांत आधीच तक्रार दाखल करून ठेवली होती. बुधवारी (8 नोव्हेंबर) दुपारी तीन वाजून 40 मिनिटांच्या सुमारास बुटासिंगसह सहा बुरखेधारी व्यक्ती फॉर्च्युनर कारमध्ये बसून आले. बीनससिंगचे आजोबा गुरदेवसिंग हे हवाई दलातून निवृत्त झालेले अधिकारी आहेत. त्यांच्या घरात हे बुरखेधारी दाखल झाले.

त्या वेळी गुरदेवसिंग यांच्यासह त्यांची पत्नी जसवंतकौर, मुलगा अमनदीपसिंग हॅपी, भाचा गुरनूरसिंग हे सर्व जण घरात होते; मात्र बुटासिंगसह एकूण तीन जणांकडे पिस्तूल होतं. त्यामुळे सर्व जण घाबरले.गुरदेवसिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुटासिंग पासला आणि अन्य अपहरणकर्त्यांनी एका मिनिटाच्या आत बीनसला घेऊन पलायन केलं. सर्वांनी त्यांच्याशी सामना करण्याचा प्रयत्न केला. गुरदेव, अमनदीप, गुरनूर यांनी कारपर्यंत त्यांचा पाठलागही केला. तसंच लाठीहल्ला करून बीनसला सोडवण्याचा प्रयत्न केला; मात्र तो अयशस्वी ठरला. पोलीस स्टेशन, कंट्रोल रूमसह अन्य सर्व आपत्कालीन नंबर्सवरही त्यांनी सूचित केलं. तरीही कार सापडू शकली नाही.

गुरदेवसिंग यांनी सांगितलं, की जावई बुटासिंग त्यांच्या मुलीला मारहाण करायचा. मुलगी यूकेला गेल्यानंतर दोन-अडीच वर्षं तिचा मुलगा त्यांच्याकडेच राहत होता. त्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवलेली होती. गुरदेवसिंग यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या व्यक्तींनी सांगितलं, की ती फॉर्च्युनर कार सकाळी सात-साडेसातपासूनच त्या भागात फेऱ्या मारत होती. बीनससिंग शाळेतून आल्यानंतर लगेचच अपहरणकर्त्यांनी त्याचं अपहरण केलं. आपला नातू बीनस याचे प्राण वाचवावेत, अशी विनंती गुरदेवसिंग यांनी पंजाब सरकार आणि पोलीस उच्चाधिकाऱ्यांना केली आहे. बुटासिंग आपली मुलगी आणि नातवाला ठारही करू शकतो, अशी भीतीही गुरदेवसिंग यांनी व्यक्त केली आहे.

सुधार ठाण्याचे प्रभारी इन्स्पेक्टर अमृतपालसिंग यांनी सांगितलं, की लुधियानाचे ग्रामीण एसएसपी नवनीतसिंग यांना या प्रकरणाबद्दल माहिती देण्यात आली आहे. बुटासिंगचा मोबाइल बंद असल्याने त्याचं लोकेशन कळू शकलं नाही. कारच्या नंबरप्लेटवर माती किंवा अन्य काही लावून ती झाकण्यात आलेली असल्याने कारचा नंबरही कळू शकला नाही. बुटासिंगच्या गावी पोलीस गेले; मात्र तिथे तो सापडला नाही. कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रकरणाचा तपास केला जात आहे. बीनसच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देऊन त्या अनुषंगाने उच्चाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पावलं उचलली जात आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार